मेट्रो कामात पुन्हा निष्काळजीपणा; घोडबंदर मार्गावर लोखंडी राॅड वाहनावर पडला, चालक थोडक्यात बचावला.

Spread the love

मेट्रो कामात पुन्हा निष्काळजीपणा; घोडबंदर मार्गावर लोखंडी राॅड वाहनावर पडला, चालक थोडक्यात बचावला.

योगेश पांडे / वार्ताहर

ठाणे – भिवंडी येथे मेट्रो कामासाठी लागणारी लोखंडी सळई प्रवाशाच्या डोक्यात घुसल्याचे प्रकरण ताजे असताना, आता घोडबंदर मार्गावरील कापुरबावडी भागात दोन लोखंडी राॅड कारवर पडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सुरु असलेल्या कामांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कापूरबावडी भागात आता पर्यंत तीन वाहनांसोबत अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या आणि वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठाणे शहरात मेट्रो चार (ठाणे- घाटकोपर-वडाळा) आणि मेट्रो पाच (ठाणे-भिवंडी-कल्याण) या मार्गिकेच्या निर्माणाची कामे सुरू आहेत. या कामांमुळे नागरिकांना वाहतुक कोंडीचा मन:स्ताप सहन करावा लागतो. त्यासोबत आता त्यांची सुरक्षितता देखील धोक्यात आली आहे. मेट्रो चार आणि पाच या दोन्ही मार्गिकांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या टप्प्याची कामे कापूरबावडी येथे सुरू असतानाही येथे कामामध्ये देखील निष्काळजीपणा दिसून येत आहे.

भिवंडी येथील काल्हेर भागात राहणारे ४७ वर्षीय अमोल लाठे हे त्यांच्या ८३ वर्षीय वडिलांना कारमधून घोडबंदर येथील एका खासगी रुग्णालयात गेले होते. परंतु रुग्णालय बंद असल्याने ते घोडबंदर येथून कापूरबावडी मार्गे काल्हेर येथे परतत असताना कापूरबावडी भागात अचानक मेट्रोच्या कामासाठी उन्नत मार्गावर ठेवलेले दोन राॅड त्यांच्या वाहनावर पडले. हे राॅड कारच्या आरशावर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर संतापलेल्या अमोल लाठे यांनी तेथील कंत्राटदार कर्मचाऱ्यांना जाब विचारला. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. कापूरबावडी भागात यापूर्वी अशा दोन घटना उघडकीस आल्या होत्या. ३० जुलैला तत्वज्ञान विद्यापीठ भागातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकाच्या कारवर राॅड पडला. या घटनेत चालक थोडक्यात बचावला होता. २ मे या दिवशी एका कारवर मेट्रो कामासाठी बसविण्यात आलेल्या क्रेनचा भाग कोसळला. या घटनेतही चालक आणि त्याचे कुटुंबिय बचावले होते. आता अमोल यांच्यासोबत ही घटना घडल्याने कंत्राटदारांच्या कामाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon