पोलिसांचा सायरन लावून दरोडा टाकण्याचा कट; संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी उधळला डाव
योगेश पांडे / वार्ताहर
छत्रपती संभाजीनगर – पोलिसांच्या सायरन व अंबर दिव्याचा वापर करून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्या कारमधून दरोड्यासाठी लागणारे शस्त्रसाहित्य आणि पोलिसांची नक्कल करणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. मात्र, अंधाराचा फायदा घेत टोळीतील चार जण फरार होण्यात यशस्वी झाले.
गुप्त माहितीवर सापळा
छत्रपती संभाजीनगर स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की, मुंबई-नागपूर हायवेवरील बेलगाव शिवारात ‘ह्युंडाई वरना’ कारमध्ये काही संशयित दरोड्याची तयारी करत आहेत. त्यानुसार पोलिसांनी वैजापूर हद्दीत सापळा रचून अचानक छापा टाकला. या कारवाईत अमोल साईराम गायकवाड आणि गोविंद निवृत्ती पवार या दोघांना पकडण्यात आले, तर चार साथीदार मक्याच्या शेतातून पसार झाले.
पोलिस वेशातील साहित्याने धक्कादायक खुलासा
पोलिसांनी कारची तपासणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. दरोड्यासाठी लागणाऱ्या साहित्याबरोबरच पोलिसांची नक्कल करणारे साहित्य देखील जप्त झाले. त्यात गावठी कट्टा व १ जिवंत काडतूस, नायलॉन दोरी, कटर, हातोडा, छन्नी, लोखंडी पकड, पाना, सळई, चाकू, सीसीटीव्हीवर फवारण्यासाठी काळा स्प्रे, ब्लेड, मास्क, मिरची पावडर, तसेच अंबर दिवा, पोलीस सायरन आणि लाठी यांचा समावेश आहे.
मुद्देमाल व गुन्हा दाखल
या कारवाईत पोलिसांनी एकूण ₹१,५९,४५० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पकडलेल्या दोन्ही आरोपींना वैजापूर पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे पोलिस वेश धारण करून दरोडा टाकण्याचा मोठा कट उधळला गेला असून, ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा आपली तत्परता आणि दक्षता सिद्ध केली आहे.