नालासोपारा पूर्वेकडील चार मजली इमारत अचानक कलंडली; नागरिकांची पळापळ, जीवितहानी नाही
योगेश पांडे / वार्ताहर
वसई – नालासोपारा पूर्वेतील प्रगती नगर भागात एक मोठी घटना घडली आहे. येथील ४० फ्लॅट असलेली ‘सबा अपार्टमेंट’ ही इमारत अचानक एका बाजूला कलंडल्याने मोठी धावपळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, रहिवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले आहे. सितारा बेकरी जवळील परिसरात ही घटना घडली. इमारत धोकादायक स्थितीत आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. खबरदारीचा उपाय म्हणून, आजूबाजूची इमारत देखील तातडीने रिकामी करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस, पालिका अधिकारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण सबा अपार्टमेंट आणि शेजारील इमारतही रिकामी केली. रहिवाशांनी आपले सामान बाहेर काढण्यासाठी एकच गर्दी केली, ज्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण होते. सुदैवाने, या घटनेत कोणतीही व्यक्ती जखमी झाली नाही किंवा कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या इमारतीभोवती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पुढील कारवाई पालिका प्रशासन करत आहे.
विरारमध्ये नुकत्याच झालेल्या रमाबाई अपार्टमेंट इमारत दुर्घटनेत १७ जणांचा मृ्त्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच, नालासोपारा येथील ही घटना धोकादायक इमारतींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर घेऊन आली आहे. नालासोपारा, वसई, विरार यासारख्या शहरांमध्ये अनेक जुन्या आणि धोकादायक इमारती आहेत. ज्यामुळे रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. पालिका प्रशासनाकडून अशा इमारतींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.