उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई! तब्बल २ कोटीचा अवैध मद्यसाठा जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर पन्हाळे तर्फे सौंदळ येथे राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने २ कोटीचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. गोवा येथून मुंबईला जाणाऱ्या दहाचाकी ट्रकमधील २ कोटी ११ लाख ७२ हजार २८० रुपये किमतीचे गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे १८६६ बॉक्स आणि २५ लाख रुपये किंमतीचा दहाचाकी कंटेनर उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. याप्रकरणी कंटेनर चालक आसिफ आस मोहम्मद याला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईत दुय्यम निरीक्षक एस. एस. गोंदकर, जवान चंदन पंडीत, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक रत्नागिरीचे निरिक्षक अमित पडळकर, जवान निलेश तुपे, जवान मलिक धोत्रे यांनी भाग घेतला. कारवाईत मोठ्या प्रमाणात परराज्यातील मद्यसाठा जप्त करण्यात आलेला आहे. यात आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बेकायदा गोवा बनावटी दारू वाहतूक केल्याप्रकरणी जुना बाजार सावंतवाडी येथील युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तन्मय सुधाकर पांगम (२२) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून गाडीसह एकूण ३ लाख ५० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आचरा पोलिसांनी बुधवारी पहाटे ३.३० च्या दरम्यान आचरा तिठा येथे केली.