अलिबागमध्ये प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे २०१८ साली तरुणीच्या काकांची हत्या; जामिनावर बाहेर आल्यानंतर १ सप्टेंबर २०२५ रोजी प्रेयसी तरुणीची हत्या
योगेश पांडे / वार्ताहर
रायगड – रायगड जिल्ह्यात काही दिवसांपासून आत्महत्या आणि हत्येचं सत्र सुरू असून गेल्या तीन महिन्यात अंदाजे २५ घटना घडल्या आहेत. त्याचदरम्यान, आता रायगड जिल्ह्यात एकाच दिवशी दोन महिलांची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलिस स्टेशन हद्दीत असणाऱ्या अलिबाग तालुक्यातील दिवीवाडी येथे तरुणीचे काका तुकाराम सजन्या नाईक यांची हत्या केल्यानंतर तुरुंगात जावं लागलं होतं. या गोष्टीचा राग मनात धरून आता त्यांची पुतणी अर्चना चंद्रकांत नाईक (३६) हिचा गळा आवळून तिला ठार मारलं असल्याची फिर्याद दर्शना किशोर नाईक (३९) यांनी दत्ताराम नागू पिंगळा याच्या विरोधात रेवदंडा पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण अर्चना चंद्रकांत नाईक हिचे घराशेजारीच राहणाऱ्या दत्ताराम नागू पिंगळा याच्याबरोबर प्रेमसंबंध होते. मात्र, त्यांच्या प्रेमसंबंधाला तिच्या काकांचा म्हणजे तुकाराम सजन्या नाईक यांनी विरोध केला होता. तसेच अर्चना नाईक हिचा विवाह चंद्रकांत अशोक नाईक यांच्याशी लाऊन दिला. या गोष्टीचा राग मनात धरून दत्ताराम नागू पिंगळा याने २८ मार्च २०१८ रोजी तुकराम सजन्या नाईक यांच्या डोक्यावर आणि पाठीमागे धारदार हत्याराने मारहाण करून दुखापत करून त्यांना गंभीर जखमी केलं होतो. तुकाराम सजन्या नाईक यांच्यावर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना ३१ मार्च २०१८ रोजी त्यांचं निधन झालं. त्यामुळे आरोपी दत्ताराम नागू पिंगळा याला सदर गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली होती.
दरम्यान, या गोष्टीचा मनात राग आरोपी दत्ताराम पिंगळा याच्या मनात होता. आरोपी दत्ताराम हा जेलमधून जामिनावर एप्रिल २०२४ मध्ये बाहेर आल्यानंतर दत्तारामने अलिबागला १ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तो मयत अर्चना नाईक हिला भेटण्यासाठी दर्शना नाईक यांच्या आईच्या घरी आला होता. आरोपी दत्ताराम पिंगळा हा मयत अर्चना नाईक हिच्याबरोबर बोलत असताना त्यांचा वाद झाला. रागात्या भरात त्याने अर्चनाचा दोरीच्या साहाय्याने गळा आवळून तिची हत्या केली. दरम्यान, रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास अलिबाग उपविभागीय पोलिस अधिकारी माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले हे करीत आहेत.