चेंबूरमध्ये हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेची धडक; ८ जण अटक, ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई : चेंबूर परिसरातील अवैध हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेने कारवाई करत मोठी धडक दिली आहे. गोवंडी पोलिसांच्या कक्ष-६ गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.१५ वाजता चेंबूर येथील ‘कर्मा हुक्का पार्लर’ वर छापा टाकून ही कारवाई केली. या कारवाईत पार्लरचा मॅनेजर/कॅशियर, दोन वेटर आणि पाच ग्राहक अशा एकूण ८ जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी छाप्यात एकूण ₹३२,३८० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ₹३,४०० रोख, ₹२३,८०० किमतीचे तंबाखू मिश्रित विविध फ्लेवर्स आणि ₹५,१८० किमतीची हुक्का साहित्य सामग्रीचा समावेश आहे.
कारवाईनंतर पंचनामा करण्यात आला असून सर्व आरोपी व जप्त माल पुढील कायदेशीर कारवाईसाठी गोवंडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणी भा.दं.वि. कलम २८७, १२५, २२३, ३(५) तसेच सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ कायदा २००३ (सुधारणा अधिनियम) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सावंत यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यांच्या पथकाने अचूक माहितीच्या आधारे वेळीच कारवाई करत अवैध धंद्याचा पर्दाफाश केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. चेंबूर परिसरात पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे हुक्का पार्लर चालवणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.