गोविंदा – सुनीता आहुजा वैवाहिक वाद चव्हाट्यावर; फसवणूक, छळाचे आरोप, ३८ वर्षांच्या संसारावर घटस्फोटाची सावली
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांचे वैवाहिक आयुष्य आता गंभीर टप्प्यावर आले आहे. ३८ वर्षांचा संसार संपुष्टात आणण्यासाठी सुनिताने थेट बांद्रा फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनिताने गोविंदावर वैवाहिक जीवनात फसवणूक व मानसिक छळ केल्याचे आरोप केले आहेत. तसेच तो सध्या वेगळा राहत असल्याने, वैवाहिक आयुष्य टिकवणे अशक्य झाल्याचं त्यांनी न्यायालयासमोर मांडलं आहे. हिंदू विवाह अधिनियम १९५५ च्या कलम १३ (१) (आय), (आयए), (आयबी) अंतर्गत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, कोर्टाने गोविंदाला २५ मे रोजी समन्स बजावलं होतं. जूनपासून पती-पत्नीमध्ये समझोत्याचा प्रयत्न सुरू आहे. सुनीता प्रत्येक सुनावणीला कोर्टात हजर राहतात; मात्र गोविंदा हजर नसल्याचे समोर आले आहे. याआधी सुनीताने आपल्या ब्लॉगमधून घटस्फोटाच्या अफवांवर भाष्य करत स्पष्ट केलं होतं की, वैयक्तिक आयुष्यातील प्रसंग कठीण असले तरी त्या देवावर विश्वास ठेवून पुढे जातील. अलीकडेच त्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनाला गेल्या होत्या. तेव्हा भावुक होत त्यांनी सांगितलं – “मी लहानपणापासून आईला (देवीला) फक्त एकच इच्छा मागितली होती, गोविंदाशी लग्न होऊन संसार सुखाचा व्हावा. आईने मुलांसह सर्व दिलं. पण प्रत्येक गोष्ट सहज मिळत नाही. माझं घर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आई पाहून घेईल.”
गोविंदा – सुनीता आहुजामधील मतभेद आणि वेगळ्या जीवनशैलीमुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. याचबरोबर गोविंदाची एका तरुण मराठी अभिनेत्रीशी वाढती जवळीक हा त्यांच्या नात्यातील तणावाचा मुख्य मुद्दा असल्याचा दावा फेब्रुवारीत अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. मात्र त्यानंतर वकिलांनी सांगितलं होतं की, घटस्फोटाचा अर्ज सहा महिन्यांपूर्वी दाखल झाला असला तरी दोघे पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. पण आता सुनिताने केलेले गंभीर आरोप, कोर्टातील कारवाई आणि चालू वाद पाहता या स्टार जोडप्याच्या संसाराचा शेवट निश्चित होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.