पोलीस कॉन्स्टेबलचा लोकल ट्रेनच्या महिला डब्यात महिलांशी गैरवर्तन; पोलीस कॉन्स्टेबलविरुद्ध धमकी देणे आणि जबरदस्ती करण्याचा गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
वसई – मुंबईतील मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस कॉन्स्टेबलने लोकल ट्रेनच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार केला आहे. त्याने डब्यात असलेल्या महिलांशी गैरवर्तन केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी, वसई रोड रेल्वे पोलिसांनी संबंधित पोलीस कॉन्स्टेबलविरुद्ध धमकी देणे आणि जबरदस्ती करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसानेच हे कृत्य केल्याने मुंबईतल्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एक दा ऐरणीवर आला आहे. ही घटना शनिवारी दुपारी बोरीवली-वसई लोकल ट्रेनमध्ये घडली. महिला प्रवाशांनी आरोप केला आहे की, अमोल किशोर सपकाळे नावाचा पोलीस कॉन्स्टेबल खाकी वर्दी घालून मीरा रोड स्टेशनवरून महिलांच्या डब्यात चढला. तो दारूच्या नशेत होता. डब्यातील महिलांनी सांगितले की, सपकाळे जाणूनबुजून आपल्या कोपराने महिला प्रवाशांच्या पाठीला स्पर्श करत होता. सीटवर बसून काही महिलांकडे तिकीट मागण्याचा बहाणा करत होता. असा आरोप या लोकल ट्रेनमध्ये असलेल्या महिलांनी केला आहे.
तो महिलांकडे घाणेरड्या नजरेनेही पाहत होता असं ही काही महिला म्हणाल्या. एवढेच नाही, तर त्याने काही महिलांचे मोबाईल फोनही हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. यामुळे त्रस्त झालेल्या काही महिलांनी त्याला नायगाव स्टेशनवर जबरदस्तीने उतरवले आणि स्टेशन मास्तरांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर स्टेशन मास्तरांनी वसई रोड रेल्वे पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अमोल सपकाळेला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी नेले. अभया अक्षय वर्णेकर नावाच्या एका महिला प्रवाशाने वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी योग्य कारवाई करत आरोपी कॉन्स्टेबलला अटक केली. नशेत असलेल्या आरोपीच्या महिलांसोबतच्या या गैरवर्तनामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या पोलिसा विरुद्ध कडक कारवाई केली जावी अशी मागणी महिलांनी केली आहे.