मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात; मनोज जरांगे पाटील सुखरुप असल्याची प्राथमिक माहिती
योगेश पांडे / वार्ताहर
बीड – बीडमधून मोठी बातमी समोर आली आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील प्रवास करत असणाऱ्या लिफ्टचा अपघात झाला आहे. मनोज जरांगे लिफ्टमध्ये असताना ती लिफ्ट थेट जमिनीवर कोसळली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या अपघातातून मनोज जरांगे सुखरुप बचावल्याची माहिती आहे. मनोज जरांगे सुखरुप असल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांकडून मिळाली आहे. जरांगे बीडमध्ये एका रुग्णालयात गेले होते. ते लिफ्टमधून जात असताना पहिल्या मजल्यावरुन लिफ्ट थेट जमिनीवर कोसळली. यावेळी लिफ्टमध्ये मनोज जरांगे यांच्यासोबत त्यांचे इतर काही सहकारी देखील होते, अशी प्राथमिक माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, लिफ्ट जमिनीवर कोसळल्यानंतर मोठी धावपळ उडाली. यावेळी लिफ्टचे दरवाजे देखील उघडत नव्हते. त्यामुळे लिफ्टचा दरवाजा तोडून मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी सातत्याने उपोषण करतात. त्यामुळे त्यांची तब्येत सारखी बिघडत असते. असं असताना त्यांच्यासोबत आज असा प्रसंग घडल्यामुळे त्यांच्या चाहत्यांकडून त्यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त केली जात आहे. मनोज जरांगे हे आजच्या घडीला मराठा समाजाचे सर्वात ताकदवान नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर समाजाचं खूप प्रेम आहे. अशा नेत्यासोबत अशी काही घटना घडल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. पण मनोज जरांगे सुदैवाने या संकटातून सुखरुप बचावले आहेत.
मनोज जरांगे पाटील हे रविवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. बीडमध्ये शिवाजीराव मेडिकल केअर नावाचं मोठं रुग्णालय आहे. इथे एका रुग्णाला भेटण्यासाठी मनोज जरांगे पाटील आले होते. संबंधित रुग्ण हा दुसऱ्या मजल्यावर दाखल होता. त्याला भेटण्यासाठी मनोज जरांगे हे दुसऱ्या मजल्यावर जात होते. पण पहिल्या मजल्यावर अचानक लिफ्ट बंद झाली आणि ती थेट खाली तळमजल्यावर जावून कोसळली. यावेळी मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारीदेखील लिफ्टमध्ये होते.