नालासोपारामध्ये पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीची हत्या केल्याच्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे

Spread the love

नालासोपारामध्ये पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीची हत्या केल्याच्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे

पत्नी कोमल आणि प्रियकर मोनू दोघांना पुण्यातून अटक

योगेश पांडे / वार्ताहर

नालासोपारा – नालासोपारामध्ये पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीची हत्या केल्याच्या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ तारखेला कोमल आणि मोनू हे दोघं आधी नालासोपारा स्टेशनवर गेले. जिथे त्यांच्यासोबत कोमलचा ५ वर्षांचा मुलगाही होता. तिघांनी नालासोपारा स्टेशनवरून ट्रेन पकडून दादर गाठले. दादरहून ते बसने पुण्याला रवाना झाले. पुण्यामध्ये ते काही दिवस एका घरात बेकायदेशीरपणे राहत होते, अशी माहिती समोर आली आहे. आरोपींनी मृत विजयच्या फोनमधून सिमकार्ड काढून ते स्वतःच्या फोनमध्ये टाकले होते. ज्याचा उद्देश बँक ट्रान्झॅक्शनसाठी ओटीपी तयार करणे हा होता. जेव्हा आरोपी येथून पळून गेले, तेव्हापासून त्यांचे फोन बंद होते, परंतु पुण्याला जाऊन ट्रान्झॅक्शन करण्यासाठी ओटीपी पुन्हा तयार करण्यात आला. पोलिसांनी त्या ओटीपीच्या मेसेजवरून पुण्यातील ठिकाण शोधले. त्यानंतर, त्या परिसरात जाऊन लोकांना फोटो दाखवले आणि आरोपींना पकडले.या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती उघड झालीय. त्यामध्ये विजयच्या घरातील फरशा त्याच्या मोठ्या भावाने, अजयनेच बदलल्या होत्या.

मुंबईजवळील नालासोपारा पूर्वेकडील गडगापाडा परिसरात राहणारे विजय चव्हाण १७ दिवसांपूर्वी बेपत्ता झाले होते. विजयचे दोन्ही भाऊ त्यांना शोधण्यात गुंतले होते. चार दिवसांपूर्वी विजयची पत्नी कोमल चव्हाण देखील अचानक बेपत्ता झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, शेजारी राहणारा मोनू शर्माही तेव्हापासून गायब होता. याच दरम्यान कोमल आणि मोनू यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. सोमवारी सकाळी विजयचे दोन्ही भाऊ त्याच्या घरी पोहोचले असता त्यांना घरातील फरशा वेगवेगळ्या रंगाच्या दिसल्या. त्यांनी फरशा काढल्या असता त्यांना एक बनियान दिसले आणि तिथून प्रचंड दुर्गंधी येत होती. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पेल्हार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी माती व इतर मलबा बाजूला करून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांनी फरार आरोपींना मंगळवारी अटक केली. त्यानंतर त्यांच्या चौकशीत हा खुलासा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon