१०० मीटरच्या अंतरासाठी रुग्णवाहिकेने तब्बल ४ हजार रुपये आकारले; सर्वसामान्य रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये संतापाची लाट
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – नवी मुंबईतील वाशी परिसरात एका धक्कादायक प्रकाराला उघडकीस आला आहे. फोर्टिस हॉस्पिटल ते नमुपा हॉस्पिटल या अवघ्या १०० मीटरच्या अंतरासाठी रुग्णवाहिकेने तब्बल ४ हजार रुपये आकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, रुग्णवाहिकेचा प्रत्यक्ष वापर न होता, केवळ स्ट्रेचरच्या माध्यमातून रुग्णाला हलवण्यात आलं. तरीदेखील संपूर्ण शुल्क वसूल करण्यात आलं. या प्रकाराने सर्वसामान्य रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ८ जून २०२५ रोजी संध्याकाळी सुमारे ७.३० ते ८.३० दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी हिमांशू पाटील यांनी वाशी पोलीस ठाण्यात लिखित तक्रार दाखल केली आहे. घटनेचा व्हिडीओ पुरावा देखील पोलिसांना सादर करण्यात आला आहे. केवळ स्ट्रेचर वापरून रुग्णाला एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. रुग्णवाहिका प्रत्यक्षात वापरलीच नाही, तरीही चार हजार शुल्क आकारण्यात आलं. ही थेट फसवणूक असून, अशा प्रकरणांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी तक्रारदार पाटील यांनी केली आहे.
वाशी पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. सदर व्हिडीओ पुराव्याच्या आधारे संबंधित अॅम्ब्युलन्स सेवा व हॉस्पिटल प्रशासन यांची चौकशी केली जाईल का, याबाबत आता नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. हा प्रकार केवळ एक घटना नसून, नवी मुंबईत अनेक खासगी रुग्णवाहिका सेवा देणाऱ्या एजन्सीज अशाच प्रकारे अवास्तव दर आकारत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांची अडचणीचा गैरफायदा घेत काही एजन्सीज कशा पद्धतीने लूट करत आहेत. याचं हे आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. नागरिकांनी अशा घटनांमध्ये आरोग्य विभाग, आरटीओ आणि महानगरपालिका प्रशासनाने लक्ष घालावं, अशी मागणी केली आहे. खासगी रुग्णवाहिका सेवा देणाऱ्या एजन्सीजसाठी दरनिश्चिती आणि किमान सेवा निकष ठरवले जावेत, अशी मागणी सोशल मीडियावरूनही होत आहे. १००० मीटर अंतरासाठी ४००० शुल्क वसूल करून केलेली ही आर्थिक लूट गंभीर असून, पोलिसांनी त्वरीत कारवाई केली नाही, तर अशा प्रकारांना आळा बसणार नाही. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या भावनांशी खेळणाऱ्या एजन्सींवर कठोर उपाययोजना होणं गरजेचं आहे.