मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा; ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन

Spread the love

मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा; ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन झाले. १९ जून रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २० जून रोजी, शुक्रवारी विवेक यांच्या पार्थिवावर मुंबईतील अंधेरी परिसरात असणाऱ्या ओशिवरामधील स्मशान भूमीत सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. विवेक लागू हे दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती होते. तर अभिनेत्री-लेखिका मृण्मयी लागू ही त्यांची मुलगी आहे. विवेक यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वाचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. त्यांनी विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले होते. दरम्यान विवेक लागू यांचे निधन नेमके कोणत्या कारणामुळे झाले, हे अद्याप समोर आलेले नाही. त्यांनी मराठीसह हिंदीमध्येही काम केले होते. त्यांच्या गाजलेल्या कलाकृतींविषयी बोलायचे झाल्यास, टीव्ही चित्रपट ‘गोदावरीने काय केले’ (२००८), ‘अग्ली’ (२०१३), ‘व्हॉट अबाउट सावरकर’ (२०१५), ‘३१ दिवस’ (२०१८) इ. कलाकृतींचा उल्लेख करावा लागेल. त्यांंच्या ‘चार दिवस सासूचे’, ‘हे मन बावरे’ या मालिकाही गाजल्या होत्या.

विवेक यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झालं तर, त्यांच्या पत्नी रीमा लागू यांचे लग्नाआधीचे नाव नयन बडबडे असं होतं. रीमा यांनी अभिनय करता करता बँकेत नोकरी धरली, तेव्हा कलाकारांसाठी खास कोटा होता. बँकांमधील नाटकांच्या स्पर्धांदरम्यान त्यांनी आणि विवेक यांची भेट झाली होती. विवेक तेव्हा २३ वर्षांचे होते तर, नयन म्हणजेच रीमा यांचे वय १८ होते. दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी १९७८ साली लग्नगाठ बांधली. जवळपास तीन दशके एकत्र संसार केल्यानंतर काही कारणास्तव त्यांच्या नात्यात कटूता आली आणि त्यांच्यातील मतभेद वाढू लागले. घटस्फोटानंतरही अभिनेत्रीने रीमा लागू हेच नाव लावले होते. रीमा यांचे २०१७ साली निधन झालं. घटस्फोट झालेला असतानाही त्यांच्यामध्ये सलोख्याचे नाते होते. विवेक आणि रीमा यांची लेक मृण्मयी लागू वायकुळ हिने बॉलिवूडमध्ये मोठे नाव कमावले आहे. ‘थप्पड’, ‘स्कूप’सारख्या गाजलेल्या प्रोजेक्टची लेखिका म्हणून तिने ओळख मिळवली. तिने अभिनय केलेला ‘मुक्काम पोस्ट लंडन’ हा चित्रपटही काही वर्षांपूर्वी गाजला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon