रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी अघोरी पूजा? भरतशेठ गोगावलेंचा पुन्हा नवा वीडियो समोर

Spread the love

रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी अघोरी पूजा? भरतशेठ गोगावलेंचा पुन्हा नवा वीडियो समोर

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – पूजा ही अघोरी असू शकत नाही, असे स्पष्टीकरण देऊन ४८ तास उलटत नाही तोच मंत्री भरशेठ गोगावले यांचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. रायगडचे पालकमंत्रिपद मिळविण्यासाठी गोगावले यांनी राहत्या घरी अघोरी पूजा घातल्याचे सांगत त्यांचा नवा व्हिडिओ राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी समाज माध्यमांवर प्रसिद्ध केला आहे. तीन चार दिवसांपू्र्वी मंत्री गोगावले यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये घरात पूजा करताना भरत गोगावले दिसत होते. नेहमी दिसणाऱ्या पूजेपेक्षा वेगळी पूजा आहे, असे व्हिडीओ समोर आणणारे ठाकरे गटाचे वसंत मोरे यांचे मत होते. मात्र पूजा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पूजा ही अघोरी असू शकत नाही, असे स्पष्टीकरण गोगावले यांनी दिले होते. मात्र दोन दिवसांतच त्यांच्या पूजेचा नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मंत्री गोगावले हे एका सोफ्यावर बसलेले दिसून येत आहेत. त्यांच्या आजूबाजूला भगवे कपडे परिधान केलेले काही मांत्रिक आहेत. तसेच त्यांच्या समोर काळे कपडे परिधान केलेला एक मांत्रिक आहे. त्यांच्या हातात कसलीशी वस्तू असून ती कपाळावर लावून तो भरत गोगावले यांना देतो आहे. साधारण नेहमी होणार्‍या पूजेपेक्षा ही पूजा नवी काहीतरी आहे, असे प्रथमदर्शनी व्हिडीओत दिसते. पुरोगामी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात असले प्रकार होणे दुर्दैवी आहे. भरशेठ गोगावले यांनी अनेकदा माध्यमांशी बोलताना पूजा आणि नवसाबद्दल उल्लेख केला आहे. जर अशा पूजा करून मंत्रि‍पदे आणि पालकमंत्रिपदे मिळत असतील तर त्यांचा महायुतीच्या नेत्यांवर विश्वास नाही का, असा प्रश्न विचारला गेला पाहिजे. त्यांनी त्यांच्या नेत्यांवर विश्वास ठेवायला पहिजे. पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले अशी पूजा करत करीत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. पण पूजा करून पालकमंत्रिपद मिळाले असते तर मुख्यमंत्र्‍यांना काही कामच उरले नसते, असे सांगत महाराष्ट्र राज्य आणि भारत देश संविधानानुसार चालतो, याची आठवण सूरज चव्हाण यांनी गोगावले यांना करून दिली आहे. गोगावले यांचे तांत्रिक मांत्रिकासोबतचे नवनवीन व्हिडीओ समोर येण्यामागील कारण म्हणजे त्यांचा तटकरे यांच्याशी असलेला संघर्ष. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी सुनिल तटकरे यांची लेक आदिती तटकरे यांच्याशी गोगावले यांची स्पर्धा आहे. मात्र पालकमंत्रिपदाच्या स्पर्धेत तटकरे हे गोगावले यांना वरचढ ठरत आहेत. याच संघर्षातून गोगावले सतत तटकरे यांच्यावर शरसंधान साधत आहेत. या सगळ्याची परिणती गोगावले यांचे तांत्रिक मांत्रिकासोबतचे समोर येणारे व्हिडीओ आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon