१३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईत मराठी शाळांचा टक्का घटत असताना १३ वर्षांत महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद झाल्याचे वास्तव अधिकारातून समोर आले. केवळ शाळाच नव्हे तर शिक्षक व विद्यार्थ्यांची संख्याही कमी झाली आहे. २०१२-१३ ते २०२४-२५ या १३ वर्षांतील महापालिका शाळांतील मराठी शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या पाहिली असता मराठीबाबतचा आलेख घसरता असल्याचे चित्र आहे. २०१२-१३ वर्षी ३८५ मराठी शाळेत ८१,२१६ विद्यार्थी आणि ३,८७३ शिक्षक होते. मात्र २०२४-२५ यावर्षी २५४ मराठी शाळा, ३६,२०५ विद्यार्थी तर ९२६ शिक्षक असल्याचे समोर आले. मराठी शिक्षकांची संख्या २३ टक्के, विद्यार्थी संख्या ४५ टक्के आणि शाळांची संख्या ६६ टक्क्यांवर आल्याचे माहितीमधून समोर आले आहे.
प्रश्न शैक्षणिक नसून राजकीय आहे. अन्यथा महापालिकेने शेकडो शाळा सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न केला असता. मराठी शाळा बंद पडतील आणि इंग्रजी शाळांना वाव मिळेल, असा अमराठी प्रयत्न मराठी राजकीय नेतृत्वाने केला आहे. इंग्रजीतूनच शिक्षण हवे, अशी पालकांनी मागणी केल्याचे किमान हजार अर्ज तरी दाखवावेत. हे नेतृत्व मराठी द्वेष्टे आहे, अशी माहिती शिक्षणतज्ज्ञ, रमेश पानसे यांनी दिली. मराठीचे राजकारण करणाऱ्यांनी मराठी शाळांसाठी काहीच केले नाही. उलट इंग्रजी शाळेत प्रवेश देण्यासाठी मराठी पुढारी जास्त शिफारशी करतात, शिक्षण समितीचे माजी सदस्य शिवनाथ दराडे म्हणाले.