मनसैनीकांची मनमानी? महिला मनसे कार्यकर्त्यांनी संचालिकांना केली मारहाण’, नालासोपाऱ्यातील शाळेत गोंधळ
योगेश पांडे / वार्ताहर
नालासोपारा – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी शाळेच्या संचालिकांना धक्काबुक्की करत मारहाण केल्याची घटना परिसरात घडली आहे. शाळेतील मुलांना दाखला दिला जात नसल्याच्या वादातून मदर वेलंकनी शाळेत मनसैनिकांनी गोंधळ घातला आणि महिला मनसैनिकांनी शाळेच्या संचालिका आशा डिसोजा यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. मदर वेलंकनी एज्युकेशन ट्रस्टची शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय नालासोपारा येथील तुळींज परिसरात आहे. इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला दिला जात नसल्याचा आरोप काही पालकांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते शाळेच्या आवारात शिरले. यावेळी कर्मचार्यांनी अन्य बाहेरील लोकांना काठीने हाकलून द्या, असे सांगितल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. शाळेत घडलेली ही बाब समजताच आणखी कार्यकर्ते जमा झाले. दाखले न देता विद्यार्थ्यांची अडवणूक केली जाते, असा आरोप पालकांनी केल्याने मनसे कार्यकर्ते आणि शाळेच्या व्यवस्थापनात जोरदार वाद झाला. यावेळी मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी संचालिका आशा डिसोजा यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. मनसे कार्यकर्त्यांनी शाळेत गोंधळ घालून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेमुळे शाळा परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
शाळा प्रशासन विद्यार्थ्यांची अडवणूक करत असल्याने त्याची विचारणा करण्यासाठी आम्ही गेलो होतो. शाळेचे कर्मचारी अंगावर धावून आले. चप्पल उगारून धक्काबुक्की केल्याने या सर्व कृतीची प्रतिक्रिया म्हणून आमच्या महिला कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली”, असे मनसे शहर संघटक रवींद्र पाटेकर यांनी सांगितले आहे. शाळा सुरू झाली असून विद्यार्थी मुले आल्यावर प्रमाणपत्र आणि निकालाची प्रत देऊ असे शाळेमार्फत सांगण्यात आले होते. मात्र काल एक विद्यार्थी दाखला मागण्यासाठी आला होता. त्याला दाखल्या संदर्भात अर्ज घेऊन येण्यास सांगितले. मात्र त्याचे पालक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना घेऊन शाळेत आले. मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आणि मला मारहाण केली”, अशी प्रतिक्रिया शाळेच्या संचालिका आशा डिसोजा यांनी दिली आहे.