दारू तस्करीसाठी तरुणांची अनोखी शक्कल, वाहनात गुप्त कप्पे बनवून तस्करी
अहेरी पोलिसांकडून दोघांना अटक करत एकूण ५ लाख ९८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
गडचिरोली – अवैध व्यवसायात गुंतलेली तरुण पिढी केव्हा काय करेल याचा नेम नाही. दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारू तस्करीसाठी विविध शक्कल लढविली जात आहे. कधी दुचाकी बाईकच्या पेट्रोल टॅंकमध्ये पेट्रोल ऐवजी चक्क दारूच्या बाटल्या टाकून तर कधी पार्सल सामानातून तर कधी नदी पात्रातून बैलगाडीने दारूची तस्करी केली जात आहे. यावेळी दारू तस्करांनी तर कमालच केली. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असताना मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने अवैध दारू वाहतूक व विक्री केली जात आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागात हा प्रकार जरा जास्तच आढळून येत आहे. पोलिसांच्या कारवाया होत असून देखील दारू तस्करी आणि विक्री थांबता थांबेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अहेरी तालुक्याला तेलंगाणा आणि छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे आणि हा नक्षल प्रभावित भाग असल्याने रात्रीच्या सुमारास छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात दारू तस्करी केली जात आहे. शिवाय लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातून देखील काही दारू तस्कर मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात दारू सप्लाय करत असल्याचे पोलीसांच्या कारवायांवर उघड झाले आहे. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात अवैध दारू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र दारू तस्कर देखील नवनवीन शक्कल लढवत दारू तस्करी करीत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. २६ एप्रिल रोजी अहेरी पोलिसांना अवैध दारू तस्करी होणार असल्याची टीप मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे येथील पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांनी आपल्या चमुसोबत महागाव ते अहेरी रस्त्यावर नाकाबंदी करत रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान वाहनांची तपासणी सुरू केली.
मध्यरात्रीपर्यंत बरेच वाहनांची तपासणी करण्यात आली. मात्र, काहीच सापडेना. अखेर मध्यरात्री दीड ते अडीच वाजेच्या दरम्यान निळ्या रंगाची अशोका लेलंड कंपनीची चारचाकी मालवाहतूक (क्रमांक एम एच- ३४ एबी-६०७०) अहेरीकडे येताना दिसली. भुजंगराव पेठा जवळ सदर चारचाकी वाहनाची तपासणी केली असता फ्लोअर पॅनल वर रिकामी गोण्या आढळून आल्या. मात्र, मध्यरात्री रिकाम्या गोण्या घेऊन चंद्रपूर पासिंगची गाडी अहेरीकडे येत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी कसून त्या वाहनाची तपासणी केली असता फ्लोअर पॅनलच्या खाल्ली कोणालाही लक्षात येणार नाही असे कप्पे तयार करून देशी विदेशी दारू तस्करी करीत असल्याचे आढळले. सदर वाहनातून अहेरी पोलिसांनी २ लाख ७८ हजार ४०० रुपयांची देशी विदेशी दारू जप्त केली. आरोपींकडून २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि ३ लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन असे एकूण ५ लाख ९८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपी अनवर खान अबुलहसन खान (४०) आणि चालक सिद्धार्थ भास्कर रंगारी (३५)असे दोघांना अहेरी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. सदर आरोपींविरुद्ध ६५ (अ),८३ महादाका नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक सत्यासाई कार्तिक, उप विभागीय पोलीस अधीक्षक अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांनी केली.