नाशिकच्या देवळाली परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या आठ सराईत गुन्हेगारांची धरपकड
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – नाशिकच्या देवळाली गाव परिसरातील सुंदरनगर येथे मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांच्या गस्तीदरम्यान दरोड्याच्या तयारीत असलेल्या आठ सराईत गुन्हेगारांची थरारक धरपकड करण्यात आली. पोलिसांना पाहताच पळ काढणाऱ्या या टोळीतील एका संशयिताकडून चुकून सुटलेली गोळी त्याच्या स्वतःच्या मांडीत लागल्याने तो गंभीर जखमी झाला. उर्वरित सात जणांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. उपनगर पोलिस ठाण्याचे डीबी पथक शुक्रवारी रात्री १ वाजता देवळालीगाव परिसरात गस्त घालत होते. त्याचवेळी सुंदरनगर भागातील एका मोकळ्या मैदानावर आठ तरुण संशयास्पदरीत्या एकत्र उभे असलेले पथकाच्या निदर्शनास आले. पोलिस वाहन जवळ येताना पाहताच सर्वजण घाबरून वेगवेगळ्या दिशांना पळू लागले.
पोलिसांनी लागलीच संशयितांचा पाठलाग सुरू केला. यावेळी १९ वर्षीय सार्थक आहेर याने पोलिसांवर गोळीबार करण्याच्या उद्देशाने पँटच्या खिशातून पिस्तूल काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पिस्तूल काढताना चुकून ट्रिगर दाबल्याने गोळी सुटून थेट त्याच्या उजव्या मांडीत घुसली. यामुळे तो जखमी झाला. पोलिसांनी त्याला तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला तातडीने मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर उर्वरित सात जणांना पोलिसांनी शर्थीने पाठलाग करत सिनेस्टाईल पद्धतीने ताब्यात घेतले. चौकशीत या आठही जणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली असून हे सर्व सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी दरोडा आणि एका स्थानिक व्यावसायिकाला लुटण्याचा कट रचल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.