भाजप-शिंदे गटात ५० जागांवरून रस्सीखेच; बूथ लेव्हलपर्यंत मोर्चेबांधणी सुरू
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुती एकत्र लढणार असली, तरी मुंबईतील त्या ५० जागांवरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे. या जागावाटपावरून महायुतीत मोठा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
मागील निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून शिंदे गटात गेलेल्या ४४ नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवारांचा पराभव करून विजय मिळवला होता. त्यामुळे आता शिंदे गट या जागांवर आपला हक्क सांगत आहे, तर भाजपलाही आपला प्रभाव कायम ठेवायचा आहे.
दहिसर, अंधेरी, जोगेश्वरी, विक्रोळी, घाटकोपर, गोरेगाव यांसारख्या मुंबईतील काही वॉर्डांत मागील निवडणुकीत अत्यंत कडवी लढत झाली होती. हेच भाग आता महायुतीतील जागावाटपाच्या वादाचे केंद्र बनले आहेत.
मुळात पश्चिम उपनगरात वॉर्डांची संख्या जास्त असून, त्या भागातून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी सर्व पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. शिंदे गटातील नेत्यांना या भागांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे, तर भाजपलाही आपल्या पारंपरिक मतांवर दावा करायचा आहे.
विभागवार बैठकांपाठोपाठ आता शिंदेंच्या शिवसेनेकडून बुथ लेव्हलवर मोर्चेबांधणी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे भाजप आणि शिंदे गटातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. महायुती एकत्र लढणार असली, तरी या ५० जागांवरून सुरू असलेला संघर्ष निवडणुकीच्या रणधुमाळीत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांना हे वाद मिटवून एकजुटीने निवडणूक लढवणे हे एक मोठे आव्हान असणार आहे.