किन्नर आखाड्याची ममता कुलकर्णीवर मोठी कारवाई ! लक्ष्मी त्रिपाठींनाही दणका
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याचबरोबर लक्ष्मी नारायण त्रिपाठींनाही आचार्य पदावरुन दूर करण्यात आले आहे. लक्ष्मी यांनीच ममता कुलकर्णीला महामंडालेश्वर केले होते. किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी हा निर्णय घेतला आहे. नव्या महामंडलेश्वरची घोषणा लवकरच करण्यात येईल, असं दास यांनी जाहीर केलं आहे. ऋषी अजय दास यांनी सांगितलं की, ‘आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी असंवैधिनिकच नाही तर सनातन धर्म आणि देश हित सोडून ममता कुलकर्णी सारख्या देशद्रोहात सहभागी असलेली महिला जिचा फिल्मी ग्लॅमरशी संबंध आहे, तिचा धर्म आखाडा आणि परंपरेचं पालन न करता थेट महामंडलेश्वर ही पदवी दिली आणि तिचा अभिषेक केला. त्यामुळे आज मला नाईलाजानं देशहित आणि सनातन समाजाच्या हितासाठी त्यांना पदावरुन मुक्त करावं लागत आहे.
ममता कुलकर्णीनं २४ जानेवारीला गृहस्थाश्रमातून संन्यास घेण्याची घोषणा केली होती. ममतानं त्यावेळी स्वत:चं पिंडदानही केलं होतं. त्यानंतर ममताला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर म्हणून जाहीर करण्यात आले होते. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी ही घोषणा केली होती. ममता कुलकर्णीचं नवं नाव श्री यमाई ममता नंद गिरी असं ठेवण्यात आलं. त्यानंतर ती सात दिवस महाकुंभमध्ये राहिली. पण, या नियुक्तीवरुन लगेच वाद सुरु झाला होता. एका महिलेला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर कसं बनवण्यात आलं हा मुख्य आक्षेप घेण्यात येत होता. ममता कुलकर्णीनं महामंडलेश्वर झाल्यानंतर या प्रश्नाचं उत्तप दिलं होतं. ‘लक्ष्मी नारायण त्रिपाठीनं माझी २३ वर्षांची तपस्या समजून घेकली. तसंच स्वामी महेंद्रानंद गिरी महाराज यांनी माझी परीक्षा घेतली, त्यामध्ये मी उत्तीर्ण झाले. माझी तीन दिवस परीक्षा घेतली. त्या परीक्षेत मी उत्तीर्ण झाल्यानंतरच मला महांडलेश्वर होण्यासाठी निमंत्रण मिळालं. मी आता बॉलिवूडमध्ये परत जाणार नाही. सनातन धर्माचा प्रचार करणार आहे, असं ममतानं सांगितलं होतं.