सातारा पोलिसांची मोठी कारवाई; घरफोडी करणाऱ्या चोरट्याच्या आवळल्या मुसक्या
योगेश पांडे/वार्ताहर
सातारा – शाहूनगर येथे गणेश हाउसिंग सोसायटीत घरफोडी करून १ लाख २७ हजाराचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या चैतन्य विशाल माने (१९) याला अटक करण्यात आली आहे. दिनांक १९ डिसेंबर रोजी ही चोरीची घटना घडली. सातारा शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने रविवार पेठ परिसरातून संशयिताला अटक करून त्याच्याकडील मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक चौकशीसाठी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सातारा शहर परिसरातील वाढत्या घरफोडीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी रात्रगस्त वाढवण्यात आली आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन मेत्रे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने रविवार पेठ परिसरातून विशाल माने याला अटक केली. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, पितळेची भांडी, चिल्लरचा डबा ताब्यात घेण्यात आला आहे.
शाहूनगर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तारांगण ऑफिस चोरट्याने फोडले होते. येथील बंद कपाटाचे दरवाजेही त्याने तोडले. मात्र तेथे काही आढळून आले नाही. सातारा पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलीस अधिक्षक समीर शेख अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी या कारवाईचे अभिनंदन केले.