स्वारगेट एसटी स्थानकात चोरी करणार्या दोन्ही महिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात, ४ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे – प्रवासानिमित्ताने स्वारगेट बसस्थानकात आल्यानंतर गर्दीत प्रवाशांकडील सोन्या – चांदीचे दागिने चोरणार्या दोन महिलांना स्वारगेट पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचे ६ तोळे दागिने जप्त करण्यात आले असून, स्वारगेट पोलीस ठाण्यातील पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. सातत्याने होणाऱ्या चोरीच्या घटनांना यामुळे काही प्रमाणात आळा बसण्याची शक्यता आहे. दुर्गा अविनाश उपाध्याय (३०) व लक्ष्मी भिवा सकट (२५) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राहुल कोलंबीकर, उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.
शहरातील स्वारगेट भागात एसटी स्टॅण्डसह पीएमपीएलची स्थानके आहेत. त्यामुळे प्रवासानिमित्ताने या भागात रोज मोठ्या प्रमाणात गर्दी होते. शहर परिसरात जाणार्या पीएमपीएल बसेस खचाखच भरून जातात. याच गर्दीचा गैरफायदा घेत चोरटे प्रवाशांकडील लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारतात. मागील काही दिवसांत सातत्याने स्थानक परिसरात प्रवाशांकडील ऐवज चोरी गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्वारगेट पोलिसांकडील दामिनी पथक याठिकाणी गस्त घालत होते. कात्रज पीएमपीएल बसस्थानक येथे दोन महिला संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती महिला पोलीस अंमलदार अनिता धायतडक यांना मिळाली. त्यानूसार स्वारगेट पोलिसांच्या पथकाने महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी स्टॅंड भागात चोरी केल्याची माहिती दिली. तपासात पोलिसांनी त्यांच्याकडून ४ लाख ८८ हजारांचे ६ तोळे दागिने जप्त केले. तर, स्वारगेट पोलीस ठाण्यातील पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.