कल्याणमध्ये खुन्नस, पोलिसांना नाव सांगितले म्हणून तलवार हातात घेऊन तरूणावर हल्ला करण्याचा प्रयत्न
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – कल्याण परिसरात दिवसाढवळ्या तलवार हातात घेऊन प्रतिशोध घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला कायद्याचा व पोलिसांचा धाक नसल्याचे दिसून येत आहे. कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली भागात एका हल्लेखोर तरूणाने तलवार हातात घेऊन एका तरूणाचा पाठलाग करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून उघडकीला आली आहे. ही दृश्यचित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे. सदर तरूण बिनधास्तपणे हातात तलवार घेऊन वावरत आहे. याप्रकरणी आर्यन पाटील आणि त्याच्या चार साथीदारांविरुध्द खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रारदार सत्कार भोईर याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सत्कार भोईर थोडक्यात या हल्ल्यातून बचावला आहे.
आर्यन पाटील याने एका वाहनाला धडक देऊन वाहनातील प्रवाशांना जखमी केले होते. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. साक्षीदार म्हणून सत्कार भोईर याने आर्यन पाटीलसह त्याच्या इतर साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली होती. सत्कारमुळे आपली नावे पोलिसांना समजली. त्यामुळे पोलिसांनी आपल्याला आरोपी केल्याचा राग आर्यन आणि त्याच्या मित्रांना आला होता. ते सत्कार भोईरला याप्रकरणी जाब विचारणार होते. पण सत्कार त्यांच्या तावडीत सापडत नव्हता. खडकपाडा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.