गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाची अज्ञात महिलेकडून तोडफोड, महिलेचा शोध सुरू
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची एका अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला पास न काढता मंत्रालयात शिरली. सचिवांसाठी असलेल्या गेटने महिलेने मंत्रालयात प्रवेश केला. या महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर ही महिला इथून निघून गेली. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
मुंबईत पाऊस सुरु असल्याने मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची घरी जाण्याची घाई सुरु होती. या मोक्याच्या वेळी ही महिला मंत्रालयात शिरल्याने पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेचे धिंधवडे निघाले आहेत. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर फडणवीसांचे कार्यालय आहे. त्या कार्यालयाची पाटी या महिलेने काढून फेकून दिली. तसेच तिथे आरडाओरडा करत ठेवण्यात आलेल्या कुंड्या देखील फेकण्यास सुरुवात केली.
या घटनेमुळे आता पोलिसांनी या महिलेचा शोध सुरु केला आहे. पोलीस आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून महिलेचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र, या घटनेमुळे मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. ही महिला गुरुवारी रात्री मंत्रालयात शिरली. त्यावेळी मंत्रालयाच्या परिसरात फारसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्यामुळे ही महिला कोणाच्याही लक्षात न येता सचिवांच्या गेटने सहजपणे आतमध्ये शिरली. यानंतर ही महिला फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर गेली आणि त्याठिकाणी कार्यालयाची तोडफोड केली.