नगरमध्ये व्यावसायिकाची ११ लाखांची फसवणूक, तिघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
अहमदनगर – पारस कंपनीचे पीव्हीसी पाईप ऑर्डर असलेल्या ठिकाणी न पाठविता ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची ११ लाख दोन हजार १४५ रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. दत्तात्रय जयसिंग जाधव (वय ४५ रा. सारोळा कासार, ता. नगर) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौतम कुमार (पूर्ण नाव पत्ता नाही), इरफान नुर मोहमद (रा. नुह, हाइ विद्यालय जवळ, फेरोजपूर नमक, मेवात, हरीयाणा) व आयशर ट्रक चालक शाद जफरू मोहद (रा. वील मुराद, मेवात, हरीयाणा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जाधव यांचे केडगाव बायपास चौक येथे श्री सावता ट्रान्सपोर्टचे कार्यालय आहे. त्यांना ११ लाख दोन हजार १४५ रुपये किमतीचे पारस कंपनीचे पीव्हीसी पाईप आणि फिटींगचा माल ऑर्डर प्रमाणे हरियाणा येथे पोहोच करायचा होता. त्यांच्याकडे ट्रक उपलब्ध नसल्याने त्यांनी ट्रान्सपोर्ट पोर्टल अॅपवर ऑर्डर टाकली. तेव्हा त्यांना गौतमकुमार याने फोन करून विश्वासात घेतले व सदरचा माल दिलेल्या पत्त्यावर पोहचविण्यासाठी एक लाख रुपये भाडे ठरवून ट्रक पाठविला. जाधव यांनी ५० हजार रूपये गौतम कुमार यांना नेट बँकिंगव्दारे दिले. तसेच इरफान नुर मोहमद याला २५ हजार व नंतर २५ हजार असे फोन पे व्दारे दिले. जाधव यांनी त्या ट्रकमध्ये ऑर्डर प्रमाणे भरून दिलेला ११ लाख दोन हजार १४५ रुपये किमतीचा माल संशयित तिघा आरोपींनी हरीयाणा येथे पोहोच न करता जाधव यांचा विश्वासघात करून गायब करून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे करत आहेत.