टिक टोक स्टार मौलाना अब्दुल रशीद ऊर्फ मिफताही कलंदर खानचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला
पोलीस महानगर नेटवर्क
कोंढवा – साद मोटर्स या गाड्या खरेदी विक्रीच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास दरमहा २ ते ३ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून ९ जणांची तब्बल १ कोटी १६ लाख रुपयांची फसवणूकीच्या प्रकरणात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यातील आरोपी टिक टोक स्टार मौलाना अब्दुल रशीद ऊर्फ मिफताही कलंदर खान याचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी हा निर्णय दिला आहे.
न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी मौलाना अब्दुल रशीद कलंदर खान याचा अटकपूर्व जामीन फेटाळताना असे निरीक्षण नोंदवले आहे की आरोपी हा समाज माध्यमावर प्रेरणादायी वक्ता असल्यामुळे तसेच त्याचे समाज माध्यमावर लाखो फॉलोवर्स असल्यामुळे त्याने इतर आरोपींपेक्षा सहजपणे गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी उद्युक्त केले व फसवणूक केली. याबाबत निसार बाबुलाल शेख (वय ५५, रा. चिंतामणीनगर, हडपसर) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रफिक कलंदर खान (वय ४४), सनोबर ऊर्फ सौदा रफिक खान (वय ४०), इसा रफिक खान (वय २३), मौलाना अब्दुल रशीद ऊर्फ मिफताही कलंदर खान (वय ४८, सर्व रा. भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२० पासून घडला आहे.
आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्जाची मुंबई उच्चन्यायालय न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. मौलाना अब्दुल रशीद कलंदर खान हा मुख्य आरोपी आहे. तो समाज माध्यमावर प्रेरणादायी वक्ता असल्यामुळे तसेच त्याचे समाज माध्यमावर लाखो फॉलॉवर असल्यामुळे त्याने गुंतवणूकदारांना सहजपणे भुरळ घातली आणि गुंतवणूक करण्यास उद्युक्त करून फसवणूक केली तसेच गुंतवणुकी पैकी तब्बल रक्कम रुपये २१ लाख अब्दुल रशीद कलंदर खान व त्याच्या कुटुंबाच्या बँक खात्यावर वर्ग झाल्याचे त्याच प्रमाणे त्याच्या गुन्ह्याच्या प्रत्यक्ष सहभागाबाबत चे पुरावे गुंतवणूकदारांचे वकील ऍड. अमेय अभय सिरसीकर यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यापूर्वी देखील आरोपी मौलाना अब्दुल रशीद कलंदर खान याचा अटकपूर्व जामीन माननीय पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला होता.