शेअर गुंतवणुकीच्या आमिषाला बळी; कल्याणमधील महिलेची महिनाभरात एक कोटींची ऑनलाईन फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : “शेअर बाजारात गुंतवणूक करा, आयपीओमध्ये पैसे टाका आणि दामदुप्पट नफा मिळवा,” अशा गोड बोलण्याच्या आमिषाला बळी पडून कल्याणमधील एका गृहिणीची तब्बल एक कोटी १७ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून नेहा अय्यर आणि प्राजक्त सामंत या दोन भामट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार श्रीरूपा सिरसीकर या कल्याण (प.) येथील खडकपाडा परिसरातील स्वामी दर्शन गृहसंकुलात वास्तव्यास आहेत. त्यांचे पती एका कॉर्पोरेट कंपनीत नोकरीला असून, ऑगस्ट ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत ही फसवणूक घडली आहे.
ऑगस्ट महिन्यात नेहा अय्यर नावाच्या महिलेने फोनद्वारे संपर्क साधत, “मी गुंतवणूकविषयक कंपनीतून बोलते. कमी कालावधीत अधिकचा आर्थिक लाभ मिळवून देऊ शकतो,” असे सांगून तक्रारदार महिलेला बोलण्याच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर शेअर व आयपीओ गुंतवणुकीसाठी मार्गदर्शनाचे आश्वासन देत, विविध बँक खात्यांमधून १४ लाख ९९ हजार रुपयांचा ऑनलाईन भरणा महिलेकडून करून घेतला.
यानंतर “गुंतवणूक वाढली आहे” असा दाखला देत ऑनलाईन खात्यात ५४ लाख ३१ हजार रुपयांची रक्कम दिसविण्यात आली. मात्र, ती रक्कम काढण्याचा प्रयत्न करताच, “साठ लाख रुपये दोन दिवसांत भरल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत, अन्यथा खाते गोठवले जाईल,” असा धमकीवजा संदेश महिलेने प्राप्त केला.
अखेर फसवणुकीचा संशय आल्याने महिलेने चौकशी केली असता, संपूर्ण प्रकरण ऑनलाईन गुंतवणूक फसवणुकीचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी तत्काळ खडकपाडा पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी नेहा अय्यर आणि प्राजक्त सामंत या भामट्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, गेल्या वर्षभरात कल्याण-डोंबिवली परिसरात अशा प्रकारच्या ऑनलाईन शेअर गुंतवणुकीतून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली असून, पोलिसांकडून नागरिकांना गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.