कोट्यवधींची सायबर फसवणूक; नवी मुंबईच्या व्यावसायिकाला जामीन नाकारला
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – बनावट ऑनलाइन शेअर ट्रेडिंग योजनांद्वारे देशभरातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नवी मुंबईतील व्यावसायिक आणि श्री कन्हैया जी ट्रेडिंग कंपनीचे मालक प्रमोद रामसिंग यांची जामीन याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकलपीठाने या प्रकरणात महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. याचिकाकर्त्याने पोलिसांच्या वारंवार सूचनांकडे दुर्लक्ष केले आणि तपासात सहकार्य करण्याऐवजी चुकीची माहिती पुरवली, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, व्यवहारांशी संबंधित आवश्यक पावत्या, चलन वा नोंदी सादर करण्यात याचिकाकर्ता अपयशी ठरला असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
फसवणुकीतून मिळालेली रक्कम कर भरल्यामुळे वैध ठरू शकत नाही, असा याचिकाकर्त्याचा युक्तिवादही न्यायालयाने फेटाळला. गुन्ह्याचे गांभीर्य, गुंतवणूकदारांना झालेले आर्थिक नुकसान आणि आधीच मिळालेल्या पुराव्यांच्या पार्श्वभूमीवर सध्या जामीन मंजूर केल्यास तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
या प्रकरणात वाशीतील एका व्यावसायिकाने तक्रार दाखल केली होती. ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमधून आकर्षक परतावा देण्याचे आश्वासन देत सीआयएनव्ही – द प्रीमियर स्ट्रॅटेजी ग्रुप नावाच्या व्हॉट्सअॅप गटात सामील होण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. त्यानंतर तक्रारदाराकडून ७६ लाख रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली.
चौकशीत फसवणुकीची रक्कम श्री कन्हैया जी ट्रेडिंग कंपनीपर्यंत पोहोचण्यापूर्वी विकी ट्रेडर्स, कृष्णा फॅशन आणि श्री जी एंटरप्रायझेससह अनेक खात्यांमधून वळवल्याचे उघड झाले आहे. १७ जानेवारी ते १ जून २०२४ या कालावधीत आरोपीच्या कंपनीत तब्बल ८२ लाख रुपये जमा झाले असून तत्काळ रोख स्वरूपात काढण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर १५ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रमोद रामसिंग यांना अटक करण्यात आली. देशभरात याच पद्धतीने झालेल्या अशा नऊ सायबर फसवणुकीच्या प्रकरणांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.