सीबीआय कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेची एक कोटी १९ लाखांची फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – काळ्या पैशांच्या व्यवहारात बँक खात्याचा वापर झाल्याचे सांगत सीबीआयकडून कारवाई होणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची तब्बल एक कोटी १९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे या घटनेचा तपास करत आहेत.
८० वर्षीय ज्येष्ठ महिलेकडून ही फसवणूक करण्यात आली आहे. १६ ऑगस्ट रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. ‘व्हिडिओ कॉल’च्या माध्यमातून पोलिसांचा गणवेश परिधान केलेल्या चोरट्यांनी स्वतःला सरकारी अधिकारी म्हणून ओळख दिली. “तुमच्या बँक खात्यातून काळ्या पैशांच्या व्यवहारासाठी निधी वापरला गेला असून, या प्रकरणात सीबीआय चौकशी सुरू आहे. तुमच्यावर आणि तुमच्या पतीवर अटक होऊ शकते. अटक टाळायची असल्यास तातडीने काही रक्कम जमा करा,” अशी भीती दाखवून चोरट्यांनी महिलेला जाळ्यात ओढले.
या धमकीला घाबरून महिलेनं वेळोवेळी विविध बँक खात्यांमध्ये एक कोटी १९ लाख रुपये जमा केले. त्यानंतर चोरट्यांनी संपर्क क्रमांक बंद केला. संशय आल्याने महिलेनं चौकशी केली असता फसवणुकीचा प्रकार उघड झाला.
यापूर्वीही अशाच प्रकारात सहकारनगर परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाची एक कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. त्यावेळी चोरट्यांनी “तुमच्या खात्याचा वापर पहलगाम दहशतवादी कारवाईत झाला आहे” असा खोटा दावा करून पैसे उकळले होते.
सायबर पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या खोट्या सरकारी धमक्यांना बळी न पडण्याचे आणि संशयास्पद कॉल, व्हिडिओ कॉल अथवा लिंक प्राप्त झाल्यास तत्काळ सायबर क्राइम हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.