दारू पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून पत्नीच्या चेहऱ्यावर उकळते तेल टाकले
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – पुण्यात सध्या वेगवेगळ्या प्रकारे गुन्हेगारी वाढत आहे.अशीच एक घटना नुकतीच घडली आहे. पतीला दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून त्याने पत्नीच्या चेहऱ्यावर उकळते तेल टाकल्याची घटना हडपसर भागात घडली. महिलेचा चेहरा, गळ्याला भाजले असून, पतीविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रुपाली गणेश परदेशी (वय ३५, रा. नवीन म्हाडा वसाहत, वैदुवाडी, हडपसर) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती गणेश धनराज परदेशी (वय ४२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुपाली परदेशी यांनी याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपी गणेश याला दारू पिण्याचे व्यसन आहे. त्याने रुपाली यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. मंगळवारी (दि. २३) सकाळी रुपाली आणि दोन लहान मुले घरात होते. रुपालीने पैसे न दिल्याने त्याने कडईतील उकळते त्यांच्या चेहऱ्यावर टाकले. उकळत्या तेलामुळे रुपाली यांचा चेहरा, मान, गळा भाजला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कवीराज पाटील तपास करत आहेत.