महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की; सरकारी कामात अडथळा प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – पुण्यात गुन्हेगारीने थैमान घातले आहे. नागरिकांची सुरक्षितता ऐरणीवर आली असतानाच ज्यांच्यावर नागरिकांची सुरक्षेची जबाबदारी असलेल्या महिला पोलिसांनाच आता धक्काबुक्कीला सामोरे जावे लागत आहे. अशीच एक घटना कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. महिला पोलीस हवालदाराला धक्काबुक्की केल्याची घटना कोंढवा पोलीस ठाण्यात घडली आहे. दरम्यान शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस हवालदार शीतल लक्ष्मण जमदाडे (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार साबिया इरम अक्रम खान या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, साबिया खान हिच्याविरुद्ध नौशीन फैय्याज शेख यांनी तक्रार दिली होती. किरकोळ वादातून तक्रार दिल्याने पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. सोमवारी (२२ जुलै) रात्री साडेआठच्या सुमारास साबिया कोंढवा पोलीस ठाण्यात आली. तिने पोलीस ठाण्याचे कामकाज सांभाळणारे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. ‘तुम्ही दहावी उत्तीर्ण पोलीस आहात. आमच्यामुळे तुमचा पगार होतो. मी उच्चशिक्षित असून, तुमची पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार आहे’, अशी धमकी तिने दिली.त्यानंतर पोलीस ठाण्यात अरेरावी करून तिने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. साबिया खानने पोलीस ठाण्यात ठेवलेल्या गुन्हे नोंदविण्याच्या वहीचे पान फाडून टाकले. त्यावेळी जमदाडे यांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने जमदाडे यांच्या कानाखाली मारली. ‘तू पोलीस ठाण्याच्या बाहेर ये तुझ्याकडे बघते’ अशी धमकी दिली. साबिया खान विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक स्नेहल जाधव तपास करीत आहेत.