ठाणे एफडीएच्या निरीक्षकाला ७० हजारांची लाच भोवली, एका खाजगी व्यक्तीसह लाचलुचपतच्या जाळ्यात
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – औषध दुकानाचा परवाना मंजूर करून देण्यासाठी ७० हजारांची लाच घेताना ठाणे अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफ डी ए) औषध निरिक्षकासह एका खासगी व्यक्तीला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. कल्याण पश्चिम परिसरातील डी मार्टसमोर सापळा रचून नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी संध्याकाळी जाळं रचून ही कारवाई केली. संदीप नारायण नरवणे असे या ठाणे एफडीएच्या औषध निरीक्षकाचे नाव असून सुनिल बाळू चौधरी असे खासगी व्यक्तीचे नाव आहे. नविन औषध दुकानाचा परवाना मंजूर करण्यासाठी शासकीय फी व्यतिरिक्त स्वतःसाठी १ लाख रुपयांच्या रकमेची मागणी संबंधित व्यावसायिकाकडे केली होती. मात्र तडजोडीअंती ७० हजार रुपये घेण्यावर सहमती झाली.
संबंधित व्यावसायिकाने याप्रकरणी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभगाने कल्याण पश्चिमेत सापळा रचून संदीप नरवणे याच्या उपस्थितीत तक्रारदाराकडून ७० हजार रुपये स्विकारताना सुनिल चौधरीला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या तक्रारीवरून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ च्या कलम ७,७ (अ), १२ प्रमाणे कल्याणातील महात्मा फुले पोलीस चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.