संतापजनक! दुसरा विवाह केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा; सोने अन् पैसे देऊनही मुल होत नाही म्हणून विवाहितेचा छळ
पोलीस महानगर नेटवर्क
मंगळवेढा – मंगळवेढा परिसरात एका विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहा वर्षांपूर्वी झालेल्या लग्नावेळी १० तोळे सोने व एक लाख ७५ हजार देऊन लग्न केले. त्यानंतर पुन्हा प्लॉट व चारचाकी घेण्यास माहेरहून पैसे आणण्यासाठी व तुला मूलबाळ होत नाही म्हणून त्रास देत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी व नवऱ्याने दुसरा विवाह केल्याप्रकरणी पोलिसात पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत श्रद्धा रवींद्र पिंगळे (वय ३३, रा. दत्तनगर, बार्शी) महिलेंनी बार्शी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी पती रवींद्र श्रीकांत पिंगळे, सासू कुंदा पिंगळे, दीर निरंजन पिंगळे, नणंद ज्योती दीपक ढेरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी महिलेचा विवाह २०१४ साली झाला. त्यावेळी हुंड्याच्या स्वरूपात रक्कम व सोने देऊन लग्न करून दिले होते. तीन महिने व्यवस्थित नांदविले. काही दिवसांनी पतीने वाहन व प्लॉट खरेदीस माहेरहून पैसे आणण्यास तगादा सुरू केल्याने वाहन खरेदीस ६ लाख दिले होते. फिर्यादीचा पती बँकेत नोकरीस असून ते कामास गेल्यानंतर घरातील आम्ही सांगेल तसेच वागायचे नाही तर आम्ही नांदू देणार नाही, असे म्हणून त्रास देत होते. त्यानंतर काही दिवसांनी तुला मूलबाळ होत नाही, तू निघून जा. तुझ्यावाचून आमचे काही अडत नाही, आम्ही दुसरे लग्न लावून देऊ, असे म्हणत त्रास देणे सुरू केले व तिला घरातून हाकलून दिले. यानंतर फिर्यादी महिला ऑक्टोबर २०१६ पासून माहेरी होती. त्यानंतर तिच्याशी कोणतीच फारकत न घेता पतीने दुसरे लग्न केले. यामुळे याबाबत फिर्यादी महिलेने चौघांविरुद्ध तक्रार दिली आहे. पुढील तपास मंगळवेढा शहर पोलिस करत आहेत.