रेल्वेत नोकरीचे आमिष, बनावट लेटरहेड, ६२ जणांची ६ कोटींना फसवणूक; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून संशयिताच्या टोळीने एकाला तब्बल ११ लाखांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याचप्रमाणे, या टोळीने तब्बल ६२ जणांना आमिष दाखवून त्यांची सुमारे ६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदरचा गुन्हा तपासाकामी आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी एका महिलेसह ६२ जणांची ६ कोटी २ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच परप्रांतीयांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वीरेश राजेश वाबळे (रा. नर्मदा हौसिंग सोसायटी, लोखंडे मळा, जेलरोड, नाशिकरोड) हे जिम ट्रेनर म्हणून काम पाहतात. दि. १५ ते १८ डिसेंबर २०२१ या कालावधीत वाबळे हे सायंकाळच्या वेळी घरी असताना त्यांचे परिचित शैलेंद्र महिरे यांचा फोन आला. त्यावेळी महिरे यांनी त्यांच्या फोनवरून आरोपी रमणसिंग ऊर्फ विशालसिंग (रा. कोलकाता) याच्याशी व्हॉट्सअँप कॉलवरून बोलणे करून दिले. रमणसिंग याने महिरे यांच्या मुलाला रेल्वेत नोकरीला लावून दिले होते. त्यामुळे वाबळे यांचा रमणसिंग याच्यावर विश्वास बसला. रमणसिंग याने वाबळे यांना त्यांच्या पत्नीस रेल्वेमध्ये नोकरीस लावून देतो, असे आमिष दाखविले.
या कामासाठी रमणसिंग याने वाबळे यांच्याकडून प्रथम आठ लाख रुपये घेतले, तसेच या प्रक्रियेदरम्यान आरोपी रमणसिंग (रा. कोलकाता), निरज सिंग (रा. टाटानगर, झारखंड), ऋतूराज पाटील ऊर्फ हेमंत हनुमंत पाटील (रा. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा, जि. सांगली), राजेंद्र सिंग (रा. कोलकाता), अंशुमन प्रसाद (रा. रांची, झारखंड), संदीप सिंग (रा. रांची, झारखंड) व जैद अली (रा. वाशी, नवी मुंबई) यांनीही वाबळे यांच्या पत्नीस भारतीय रेल्वेत नोकरी लावून देतो, असे आमिष दाखविले. या सर्व आरोपींनी भारतीय रेल्वेचे बनावट व खोटे लेटरहेड, कागदपत्रे, शिक्के बनवून वाबळे यांच्याकडून वेळोवेळी रेल्वेतील नोकरी कायम करण्याकरिता एकूण ११ लाख रुपये घेतले तसेच इतर ६२ जणांकडून नोकरी लावून देण्याच्या आमिषाने एकूण ६ कोटी २ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
सदर प्रकार दि. १५ डिसेंबर २०२१ ते १३ जून २०२४ यादरम्यान जेलरोड येथे फिर्यादी वाबळे यांच्या घरी घडला. आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर उपनगर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोल्हे यांनी सांगितले.