हातावरील टॅटूने लावला खूनाचा छडा; साडेतीन वर्षानंतर आरोपीच्या आवळल्या मुसक्या
पुणे – पर्वती टेकडीवर साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा छडा एका महिलेच्या हातावरून लागला. याच पुराव्याच्या आधारावरुन तपास करत पर्वती पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. हा खून आर्थिक वादातून केल्याचे निष्पन्न झाले आहे. सुरेखा संतोष चव्हाण (वय ३६, रा. खेड शिवापूर, ता. हवेली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सागर दादाहरी साठे (वय २६ रा. सुतारदरा, कोथरूड, मूळ रा. पाटील इस्टेट) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट २०२० रोजी पर्वती टेकडीवरून तळजाईकडे जाणाऱ्या रस्त्यावर महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. याबाबत पर्वती पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. महिलेची ओळख पटलेली नव्हती. महिलेच्या हातावर सुरेखा असे नाव गोंदलेले होते. पोलिसांनी ऑगस्ट २०२० मध्ये बेपत्ता झालेल्या महिलांची माहिती घेतली. दरम्यान, रोहन चव्हाण याने खेड शिवापूर पोलिस चौकीत त्याची आई बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. तपासादरम्यान, आरोपी सागर साठेशी झालेल्या वादातून सुरेखा यांचा खून झाल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली. परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा आणि सहायक पोलिस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्वती पोलिसांनी ही कारवाई केली.