ठाण्यात राजन विचारेंचा उमेदवारी अर्ज भरताना प्रचंड शक्तीप्रदर्शन; जुन्या शिवसैनिकांसह मविआ नेते हजर

Spread the love

ठाण्यात राजन विचारेंचा उमेदवारी अर्ज भरताना प्रचंड शक्तीप्रदर्शन; जुन्या शिवसैनिकांसह मविआ नेते हजर

योगेश पांडे / वार्ताहर 

ठाणे – शिवसेनेतील दुभंगानंतर पहिल्याच लोकसभा निवडणुकांना सामोरे जाणारे ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमीत्ताने सोमवारी केलेल्या शक्तीप्रदर्शनाला संपूर्ण मतदारसंघातील जुन्या जाणत्या शिवसैनिकांसह इंडिया आघाडीतील घटकपक्षांची मोठी साथ लाभल्याचे चित्र दिसून आले. कोणतीही निवडणुक असो ठाण्यात शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन ठरलेले असते. लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी शहरातील जांभळी नाका, जुनी बाजारपेठ, टेंभी नाक्यावरुन निघणाऱ्या मिरवणुकांमधून संपूर्ण परिसरात एक वेगळा जोश, उर्जा पहायला मिळत असतो. शिवसेनेतील फुटीनंतर होणाऱ्या पहिल्याच मोठया निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांना यावेळी कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. सकाळपासूनच भगव्या टोप्या, झेंडे, उपरणे परिधान केलेल्या शेकडो शिवसैनिकांचे जथ्थे तलावपाली परिसरात जमू लागले आणि ही मिरवणुक पुर्वीसारखीच दमदार होणार याचा अंदाज येथे उपस्थितांना येऊ लागला. सकाळचे ११ वाजू लागले तसे उन माथ्यावर चढू लागले. जशी वेळ पुढे सरकू लागली तसा हा जोश, उत्साह आणखी वाढू लागला. ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदरसह आसपासच्या शहरांमधील साठी, सत्तरीकडे झुकलेले अनेक जुने शिवसैनिकांचे जथ्थे विचारे यांच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी येत होते. नवी मुंबई, कल्याणमधून लोकल गाड्यांमधून प्रवास करत ठाण्याच्या दिशेने येणारे उद्धवनिष्ठ सैनिकांचे लोंढे दुपारी १२ पर्यत या भागात येऊन धडकत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षाचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या तसबिरी असलेले फलक, रथांमधून या नेत्यांच्या छायाचित्रांची केलेली मांडणी देखील नजरेत भरणारी होती. ठाण्याच्या जुन्या बाजारपेठेत ही मिरवणुक शिरताच उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा या मिरवणुकीत झालेला सहभाग उपस्थितांचा उत्साह वाढविणारा ठरला.

ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा उमेदवार ठरत नसताना राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत असताना आनंद दिघे यांचे खरे शिष्य आज पडद्यामागे गेले आहेत, असा उल्लेख करत शिवसेनेशी, बाळासाहेबांशी आणि दिघेसाहेबांशी खरी निष्ठा राखणारे ठाणेकर निष्ठेला मत देतील अशी भूमीका मांडताच मिरवणुकीत उपस्थितांनी त्यांना भरभरुन दाद दिल्याचे पहायला मिळाले. निष्ठावंत खासदार अशा आशयाचे फलकांची गर्दी हे या मिरवणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले. ठाण्यातील वेगवेगळ्या भागातून या मिरवणुकीत सहभागी झालेल्या ज्येष्ठ शिवसैनिकांची संख्या देखील मोठी होती. ‘गेल्या दोन वर्षात आम्ही जे पहात आहोत ते वेदनादायी होते. इतके दिवस घरी बसून होतो. आज उन्हाची पर्वा करत घरी बसलो तर झोप लागणार नाही. एका निष्ठावंतासाठी घराबाहेर पडलो आहे ’ही लोकमान्यनगर भागातील आत्माराम सावंत या जुन्या शिवसैनिकाची प्रतिक्रिया बोलकी होती. ‘विचारे यांनी खासदार म्हणून काय काम केले हे मतदार ठरवतीलच. परंतु निष्ठा नावाची चिज असते की नाही? ठाण्यात वादळ उठले असताना विचारे पाय घट्ट रोवून उभे होते. त्यांच्यासाठी आम्ही नको का यायला?’ अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोरे या सावरकरनगर भागातून या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आलेले ६५ वर्षाच्या एका जुन्या शिवसैनिकाने दिली. सावंत, मोरे यांच्यासारखे शेकडो जुने शिवसैनिक या मिरवणुकीत पहायला मिळाले. विचारे यांच्या मिरवणुकीत इंडिया आघाडीतील घटकपक्ष असलेले काॅग्रेस, राष्ट्रवादी काॅग्रेस, आप यासारख्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते देखील मोठया संख्येने सहभागी झाल्याचे पहायला मिळाले. मिरा-भाईदर भागातील काॅग्रेसचे नेते मुजफ्फर हुसेन, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, काॅग्रेसचे स्थानिक नेते, पदाधिकारी या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon