मरिन ड्राईव्हवर थरार; गाडी थांबवण्याचा इशारा पण मर्सिडिजने दोन पोलिसांना चिरडलं.आरोपी चालकाला नालासोपाऱ्यातून अटक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतील मरिन ड्राइव्ह परिसरात रविवारी रात्री हिट अँड रनचा धक्कादायक घटना घडलीये. मर्सिडीज कारने कर्तव्यावर असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना उडवल्याचं समोर आलंय. मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल कृष्णकांत मिश्रा आणि राठोड हे दोघे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. सध्या या दोन्ही कर्मचाऱ्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने पोलिसांना थांबण्याचा इशारा देऊनही थेट त्याने थेट पोलिसांनाच उडवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
अपघात घडल्यानंतर आरोपी चालक घटनास्थळावरून आपल्या गाडीसह पसार झाला होता. मात्र, मरिन ड्राइव्ह पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरू ठेवला. काही तासांतच आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. निहाल सोळंकी (२९) असे या अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव असून, तो मूळचा नाशिक जिल्ह्यातील पंचवटीचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला सोमवारी सकाळी नालासोपारा परिसरातून ताब्यात घेतले. निहाल हा रविवारी रात्री अतिशय वेगाने मरिन ड्राइव्ह परिसरातून गाडी चालवत होता आणि पोलिसांची नाकाबंदी असताना थांबण्याऐवजी त्याने पोलिसांनाच लक्ष्य केले, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
संबंधित आरोपी निहाल सोळंकी याने मद्यपान केले असावे, असा संशय पोलिसांना आहे. अपघातानंतर लगेच तो पसार झाला असला तरी, त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याच्या मद्यपान चाचणीचा अहवाल आल्यानंतरच तो नशेत होता की नाही, हे स्पष्ट होईल. या संपूर्ण प्रकरणाची मरिन ड्राइव्ह पोलीस अधिक सखोल चौकशी करत असून, त्या रात्री नेमके काय घडले आणि आरोपीचा हेतू काय होता, याचा शोध घेतला जात आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना अशा प्रकारे उडवणाऱ्या आरोपीवर आता कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मरिन ड्राइव्हसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी जिथे नेहमी कडक पोलीस बंदोबस्त असतो, तिथे हा प्रकार घडल्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजनांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.