दारूच्या नशेत अपघात; पोलिसांना शिवीगाळ करत मोबाईल फोडणाऱ्या कारचालकावर गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : दारूच्या नशेत कार चालवून ट्रकला धडक दिल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका कारचालकाविरोधात मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचा मोबाईल फोडल्याचाही आरोप संबंधित चालकावर करण्यात आला आहे.
प्रज्ज्वल सोमनाथ म्हस्के (वय २७, सध्या रा. शिक्रापूर, ता. शिरूर, मूळ रा. पानमंद वस्ती, म्हस्केवाडी, जि. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रशांत नायडू यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ मे रोजी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास मुंढवा रेल्वे पुलाजवळील कोणकर वजन काट्याजवळ कार आणि ट्रकचा अपघात झाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी प्रज्ज्वल म्हस्के हा दारूच्या नशेत असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, पोलिसांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. “तुम्ही पोलीस विकले गेले आहात, बलात्कार होतो तेथे तुम्ही येत नाही आणि येथे येऊन आम्हाला त्रास देता,” असे म्हणत त्याने पोलिसांशी हुज्जत घातल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
यावेळी आरोपीने पोलीस अंमलदारांच्या हातातील मोबाईल हिसकावून जमिनीवर आपटत फोडला. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. मुंढवा पोलीस पुढील तपास करत आहेत.