आठ वर्षांचा संसार, तीन मुलं अन् ‘लव्ह जिहाद’चा आरोप; उल्हासनगर प्रकरणाला नवं वळण

आठ वर्षांचा संसार, तीन मुलं अन् ‘लव्ह जिहाद’चा आरोप; उल्हासनगर प्रकरणाला नवं वळण

योगेश पांडे / वार्ताहर

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये समोर आलेल्या कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. संबंधित आरोपीला अटक झाल्यानंतर न्यायालयाने तातडीने जामीन मंजूर केल्याने या प्रकरणामागे कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. लग्नाला आठ वर्षे झाली असून दाम्पत्याला तीन मुले आहेत. त्यामुळे हे प्रकरण नेमके ‘लव्ह जिहाद’चे कसे, असा सवाल बचाव पक्षाने न्यायालयात उपस्थित केला. न्यायालयानेही या मुद्द्याची दखल घेत आरोपींना जामीन मंजूर केला.

या प्रकरणातील पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, इमरान शेख याने स्वतःचे नाव ‘विजय’ असल्याचे सांगत आपण हिंदू असल्याचा बनाव केला होता. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि २०१९ मध्ये त्यांनी विवाह केला. लग्नानंतर ती बिहार येथे गेली असता तिचा छळ करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच बुरखा आणि हिजाब परिधान करण्यास भाग पाडले, गोमांस खाण्यास सांगितले आणि हिंदू देवी-देवतांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आल्याचाही आरोप तिने तक्रारीत केला आहे.

या तक्रारीनंतर सेंट्रल पोलिसांनी इमरान शेखसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर इमरान शेख आणि त्याच्या दोन भावांना अटक करण्यात आली. आरोपींना उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आले असता बचाव पक्षाने, “आठ वर्षांपूर्वी विवाह झाला, दाम्पत्याला तीन मुले आहेत. त्यामुळे हे प्रकरण ‘लव्ह जिहाद’चे नसून कौटुंबिक वादातून तक्रार दाखल करण्यात आली आहे,” असा युक्तिवाद केला.

दरम्यान, इमरान शेख याने दुसरे लग्न केल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाल्याचेही समोर आले आहे. त्यातूनच ही तक्रार दाखल करण्यात आल्याची चर्चा आहे.

याबाबत सेंट्रल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी सांगितले की, “इमरान शेखसह तिघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपी आणि पीडितेचे आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मुलांसोबतचे फोटो न्यायालयात सादर करण्यात आले. तसेच काही तांत्रिक मुद्द्यांचाही विचार करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon