लाचखोरांचा ‘बाजार’च उठवला! येवल्यात ८ वनकर्मचारी ताब्यात; नाशिक जिल्ह्यात प्रचंड खळबळ

लाचखोरांचा ‘बाजार’च उठवला! येवल्यात ८ वनकर्मचारी ताब्यात; नाशिक जिल्ह्यात प्रचंड खळबळ

योगेश पांडे / वार्ताहर

नाशिक – शासकीय यंत्रणांमध्ये बोकाळलेल्या लाचखोरीचा आणखी एक अत्यंत धक्कादायक आणि लाजिरवाणा प्रकार नाशिक जिल्ह्यात समोर आला आहे. येवल्यात नाशिक एसीबीने मोठी कारवाई केली असून वनपरिक्षेत्र विभागात तब्बल आठ कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्यामुळे एकच खळबळ उडाली. एकाच कार्यालयातील एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचारी लाच घेताना पकडले जाण्याची ही जिल्ह्यातील कदाचित पहिलीच मोठी घटना असावी.

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरांविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. येवला वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या हद्दीत झाडे तोडण्याच्या परवानगीसाठी लाच मागणाऱ्या तब्बल आठ कर्मचाऱ्यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे नाशिकसह संपूर्ण राज्यातील वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तक्रारदाराला त्यांच्या वनपरिक्षेत्र हद्दीतील काही झाडे तोडण्यासाठी अधिकृत परवानगी हवी होती. नियमानुसार काम असतानाही, येवला वनविभागातील कर्मचाऱ्यांनी यासाठी मोठ्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) याबाबत रीतसर तक्रार नोंदवली.

एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर येवला वनपरिक्षेत्र कार्यालयात अत्यंत गोपनियतेने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने छापा टाकला आणि एकापाठोपाठ एक अशा आठ जणांना जाळ्यात सापडले. या कारवाईची बातमी वाऱ्यासारखी पसरताच येवला परिसरात खळबळ उडाली. एसीबीने ताब्यात घेतलेल्यांची कसून चौकशी सुरू केली आहे.

या कारवाईत वनविभागाचे कोणते मोठे अधिकारी किंवा कर्मचारी सामील आहेत, त्यांची नावे अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाहीत. मात्र, संशयितांमध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश असण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. सर्व संशयितांवर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. एकाच वेळी ८ शासकीय कर्मचारी लाचखोरीत अडकल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon