हज-उमराह यात्रेच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; अल खलिफा कंपनीच्या संचालकांविरोधात MPID अंतर्गत गुन्हा

हज-उमराह यात्रेच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; अल खलिफा कंपनीच्या संचालकांविरोधात MPID अंतर्गत गुन्हा

परवेज शेख/ पुणे

पुणे : हज आणि उमराह यात्रेसाठी नागरिकांकडून लाखो रुपये उकळून फसवणूक केल्याप्रकरणी अल खलिफा टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या संचालकांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमीर सरदार शेख, मिस्बा अमीर शेख, साबीर रियाझ शेख आणि इतर आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६, ३१८, ६१ तसेच MPID कायद्याच्या कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणातील पीडितांच्या शिष्टमंडळाने अ‍ॅड. तोसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपायुक्त विवेक मसळ यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) तपास करून कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी हज आणि उमराह यात्रेचे आमिष दाखवत अनेक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा केली. मात्र, यात्रेसंदर्भातील आश्वासित सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. काहींना चुकीची माहिती देऊन आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे.

दरम्यान, अ‍ॅड. तोसिफ शेख यांनी या प्रकरणातील सर्व पीडितांनी पुढे येऊन पोलिसांकडे तक्रारी आणि जबाब नोंदवावेत, असे आवाहन केले आहे. अधिकाधिक तक्रारी समोर आल्यास आरोपींविरोधात कठोर कारवाईस मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon