राज्यातील सहा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंढे यांची पुन्हा नवी नियुक्ती

राज्यातील सहा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंढे यांची पुन्हा नवी नियुक्ती

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी उशिरा सहा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. मागील आठवड्यात जिल्हा पोलीस प्रमुखांच्या बदल्या झाल्यानंतर आता सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांना वेग आला आहे. विशेष म्हणजे धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची अवघ्या दीड महिन्यातच पुन्हा बदली करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी किंवा त्याच्या आसपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्याची परंपरा कायम ठेवली आहे. त्यानुसार मंगळवारी रात्री आठच्या सुमारास सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.

राज्य शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, संजय खंदारे यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या सचिवपदासोबत अन्न व औषध प्रशासन विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यांनी धीरज कुमार यांच्याकडून कार्यभार स्वीकारायचा आहे.

तुकाराम मुंढे यांची आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी श्रीधर डुबे यांच्या जागी पदभार स्वीकारायचा आहे.

तसेच कान्हुराज बगाटे यांची व्यवस्थापकीय संचालक, महामुंबई मेट्रो संचालन महामंडळ मर्यादित येथे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी रुबल प्रखेर-अगरवाल यांच्याकडून कार्यभार स्वीकारायचा आहे.

याशिवाय बाबासाहेब बेलदार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धुळे येथे नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीधर डुबे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई महानगर क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे येथे बदली करण्यात आली आहे. तर आर. एस. चव्हाण यांची व्यवस्थापकीय संचालक, हापकीन जीव-औषध निर्माण महामंडळ, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील प्रशासकीय स्तरावर सातत्याने होत असलेल्या बदल्यांमुळे आगामी काळात आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon