डहाणूजवळील भीषण अपघातातील जखमींची रविंद्र चव्हाणांकडून रुग्णालयात भेट
पोलीस महानगर नेटवर्क
पालघर : डहाणूजवळील धानिवरी परिसरात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग वर साखरपुड्याला निघालेल्या वऱ्हाडाच्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर डहाणूजवळील वेदांता इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे उपचार सुरू आहेत.
या पार्श्वभूमीवर रविंद्र चव्हाण यांनी रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची आस्थेने विचारपूस केली. तसेच रुग्णांच्या प्रकृतीची माहिती घेत त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करत जखमींवर सुरू असलेल्या उपचारांचा आढावा घेतला. आवश्यक वैद्यकीय सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.