घणसोलीत रिक्षाचालकांतील वादातून तरुणाची हत्या; दोन आरोपी अटकेत

घणसोलीत रिक्षाचालकांतील वादातून तरुणाची हत्या; दोन आरोपी अटकेत

पोलीस महानगर नेटवर्क 

नवी मुंबई : घणसोली रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा उभी करण्याच्या कारणावरून दोन रिक्षाचालक गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर संतप्त आरोपींनी जीवघेणा हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घणसोली रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा उभी करण्यावरून काही रिक्षाचालकांमध्ये वाद झाला. किरकोळ कारणावरून सुरू झालेला हा वाद काही वेळातच हाणामारीत परिवर्तित झाला. परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला आरोपींनी लक्ष्य केले. संतप्त झालेल्या आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्र आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कोपरखैरणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांच्या मदतीने तपासाची सूत्रे वेगाने फिरवत दोन आरोपींना अटक केली. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेनंतर घणसोली परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी रेल्वे स्थानक परिसरातील वाढत्या रिक्षा वादांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon