वसई न्यायालयातून खुनाचा आरोपी फरार; पोलिसांची मोठी शोधमोहीम सुरू

वसई न्यायालयातून खुनाचा आरोपी फरार; पोलिसांची मोठी शोधमोहीम सुरू

पोलीस महानगर नेटवर्क

पालघर : १६ वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक केल्यानंतर त्याला वसई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीने पोलिसांना चकवा देत न्यायालय परिसरातून पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली असून आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “अविनाश” उर्फ “विनय” उर्फ “विनोद” उर्फ “अजय लालता प्रसाद सोनी” (वय ४२) हा नालासोपारा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ३७/२००९ मधील आरोपी आहे. त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ आणि ३४ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणात तो अनेक वर्षांपासून फरार होता.

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या पथकाने वर्षभरापूर्वी या जुन्या खून प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू केला होता. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेसाठी त्याला ठाणे कारागृहातून वसई सत्र न्यायालयात आणण्यात आले.

दरम्यान, सुनावणीदरम्यान न्यायालय परिसरातच आरोपीने पोलिसांच्या ताब्यातून पळ काढल्याची माहिती समोर आली. आरोपीने नेमका कसा पळ काढला, सुरक्षेत कुठे त्रुटी राहिल्या आणि त्यावेळी पोलिसांचा बंदोबस्त किती होता, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

या घटनेनंतर वसई, नालासोपारा तसेच शेजारील परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून रेल्वे स्थानके, बसस्थानके आणि महामार्गांवर आरोपीचा शोध घेतला जात आहे. आरोपीचा फोटो आणि माहिती सर्व पोलीस ठाण्यांना पाठवण्यात आली आहे.

दरम्यान, न्यायालयीन ताब्यातील गंभीर गुन्ह्यातील आरोपी फरार झाल्याने पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon