आयपीएल क्रिकेट सट्टा अड्ड्यावर जळगाव पोलिसांचा धडक छापा; ₹१०.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
जळगाव : ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सट्टा अड्ड्यावर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल फोन, टीव्ही, साऊंड बार तसेच इतर साहित्य असा एकूण ₹१०,५७,३००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही जण ऑनलाइन माध्यमातून आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला. कारवाईदरम्यान सट्टा व्यवहारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले असून संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई मा. श्री. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर प्रकरणी पुढील तपास सुरू असून सट्टा रॅकेटमधील इतर संबंधितांचा शोध पोलीस घेत आहेत.