४० कोटींच्या जीएसटी महाघोटाळ्याप्रकरणी अमित उपाध्यायला अटक; बोगस कंपन्यांच्या जाळ्यातून आयटीसी गैरव्यवहार

४० कोटींच्या जीएसटी महाघोटाळ्याप्रकरणी अमित उपाध्यायला अटक; बोगस कंपन्यांच्या जाळ्यातून आयटीसी गैरव्यवहार

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : बनावट जीएसटी बिले आणि खोट्या व्यवहारांच्या आधारे सुमारे ४० कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) गैरव्यवहार केल्याप्रकरणी अमित उपाध्याय याला मुंबई जीएसटी विभागाने अटक केली आहे. आठपेक्षा अधिक कंपन्यांच्या माध्यमातून बोगस व्यवहारांचे जाळे उभे करून शासनाची मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

महासंचालनालय महसूल गुप्तचर (DGGI) च्या तपासात कोणताही प्रत्यक्ष माल किंवा सेवा पुरवठा न करता केवळ बनावट इनव्हॉइसच्या आधारे आयटीसी मिळवण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात उपाध्यायविरोधात एमआरए मार्ग पोलीस ठाणे तसेच सक्तवसुली संचालनालय (ईडी) कडेही तक्रारी दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात अनिस खान यांनी आर्थिक फसवणूक आणि कट रचल्याची तक्रार दिली आहे.

तपास यंत्रणेनुसार, अमित उपाध्याय हा Alphaneon Techsolutions Private Limited (ATPL) तसेच ‘अल्फानेऑन ग्रुप’मधील अन्य सात कंपन्यांचा संचालक आणि अधिकृत स्वाक्षरीकर्ता आहे. १४ मे २०२६ रोजी दुपारी मुंबईत वरिष्ठ आसूचना अधिकारी चंद्र शेखर तिवारी यांनी त्याला अटक केली.

तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, उपाध्याय आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कोणतीही वस्तू किंवा सेवा प्रत्यक्षात पुरवठा न करता केवळ बोगस बिलांच्या माध्यमातून नियमबाह्य पद्धतीने इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवले आणि ते इतर कंपन्यांना पुढे हस्तांतरित केले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ATPL कंपनीने अस्तित्वात नसलेल्या किंवा नोंदणी रद्द झालेल्या पुरवठादारांकडून तब्बल २० कोटी १९ लाख रुपयांचे बोगस आयटीसी घेतल्याचे समोर आले आहे. आतापर्यंतच्या तपासात या संपूर्ण नेटवर्कद्वारे ३७ कोटी ६७ लाख रुपयांहून अधिक रकमेचे नियमबाह्य आयटीसी मिळवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच ४० कोटी २९ लाख रुपयांचे बोगस आयटीसी इतर कंपन्यांना बेकायदेशीरपणे पुढे पाठवण्यात आल्याचे तपासातून उघड झाले आहे.

या गैरव्यवहारामुळे सरकारी महसुलाचे मोठे नुकसान झाल्याचे तपास यंत्रणांनी नमूद केले असून, या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, संबंधित कंपन्या आणि इतर सहकाऱ्यांची भूमिका याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon