अनैतिक संबंधातून महिलेची हत्या; दिराला झारखंडमधून अटक

अनैतिक संबंधातून महिलेची हत्या; दिराला झारखंडमधून अटक

कल्याणमधील धक्कादायक प्रकार; पोलिसांची वेगवान कारवाई, आरोपी नेपाळला पसार होण्याच्या तयारीत

योगेश पांडे / वार्ताहर

कल्याण : कल्याणमध्ये अनैतिक संबंधातून एका महिलेची तिच्याच दिराने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेचे डोके भिंतीवर आपटून गंभीर जखमी केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. खडकपाडा पोलिसांनी झारखंडमधून त्याला अटक केली असून, काही मिनिटांचा विलंब झाला असता तर आरोपी नेपाळमध्ये पसार झाला असता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, २७ एप्रिल रोजी कल्याण पश्चिमेतील एका घरातून गुड्डू देवी यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान ११ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. तपासादरम्यान मृत महिला आणि तिचा दिर बम बम कुमार यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले.

मात्र, काही दिवसांपासून महिलेने आरोपीशी बोलणे बंद केले होते. याच कारणावरून आरोपीने तिच्या घरी जाऊन वाद घातला. संतापाच्या भरात त्याने महिलेचे डोके भिंतीवर आपटल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

घटनेनंतर आरोपीचा मोबाईल बंद असल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या. पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकांकडून झारखंडमधील मूळ गावाची माहिती मिळवून तपासाची सूत्रे हलवली. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

हे पथक झारखंडमधील गोंडा जिल्ह्यात पोहोचले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यात आला. दरम्यान, पोलीस आपल्या मागावर असल्याची माहिती आरोपीला मिळाल्याने तो नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, पोलिसांनी वेळीच कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.

आरोपीला झारखंडहून कल्याणमध्ये आणल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी भूषण देवरे करत आहेत.

मृत महिलेला दोन मुले असून आरोपीलाही एक मुलगी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच दोन्ही कुटुंबांना या संबंधांची माहिती होती, असेही तपासात समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon