शेवगावच्या तेजस्वी सातपुते यांच्याकडे पुणे गुन्हे शाखेची धुरा

शेवगावच्या तेजस्वी सातपुते यांच्याकडे पुणे गुन्हे शाखेची धुरा

भोंदू खरात प्रकरणाच्या एसआयटीची जबाबदारीही कायम; कर्तबगार महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नियुक्तीने शेवगावचा गौरव

रवि निषाद / प्रतिनिधी

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या कन्या तथा आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्यावर राज्यातील महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांची पुणे शहर गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे शेवगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

राज्यात चर्चेत असलेल्या भोंदू खरात प्रकरणाच्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) जबाबदारीही सातपुते यांच्याकडे कायम ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या धाडसी, शिस्तबद्ध आणि परिणामकारक कार्यपद्धतीवर शासनाने दाखवलेला हा विश्वास मानला जात आहे.

तेजस्वी सातपुते यांनी यापूर्वी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच विविध लोकाभिमुख उपक्रम प्रभावीपणे राबवले होते. सातारा जिल्ह्यातील कार्यकाळातही त्यांनी गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेत उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. मुंबईतील विविध जबाबदाऱ्यांमध्येही त्यांनी सक्षम नेतृत्वाची छाप उमटवली होती.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंदू खरात प्रकरणाच्या एसआयटी प्रमुखपदाची जबाबदारी सातपुते यांच्याकडे कायम ठेवत त्यांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा शिक्कामोर्तब केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तपास प्रक्रियेला अधिक गती आणि बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, तेजस्वी सातपुते यांच्या नियुक्तीमुळे शेवगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील तरुणींसाठी त्यांची यशोगाथा प्रेरणादायी ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon