क्लोर मैदानाच्या विकासासाठी महापौरांचा पुढाकार; सुरक्षित व सुसज्ज सुविधांवर भर
रवि निषाद / मुंबई
मुंबई : घाटकोपर पूर्व येथील स्थानिक खेळाडू, तरुण आणि नागरिकांसाठी महत्त्वाचे मानले जाणाऱ्या ‘क्लोर मैदानाच्या’ विकासासाठी महापौर रितू तावडे यांनी पुढाकार घेतला आहे. मैदानाच्या विकासासंदर्भात सोमवारी ‘एन’ विभाग कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत मैदानाचा परिसर अधिक सुरक्षित आणि सुसज्ज करण्याबरोबरच खेळाडूंना उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, मोकळ्या जागेचे सुशोभीकरण करणे तसेच परिसरातील मूलभूत नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्याबाबत पालिका अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
स्थानिक बालकांना आणि तरुणांना खेळण्यासाठी तसेच नागरिकांना फिरण्यासाठी सुरक्षित, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक मैदान उपलब्ध करून देणे ही पालिकेची प्राथमिकता असल्याचे महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले. विकासकामे दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
स्थानिक नागरिक आणि खेळाडूंनी या निर्णयाचे स्वागत करत मैदानाच्या विकासामुळे परिसरातील क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.