पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष; भोंदूबाबाला १० वर्षे सक्तमजुरी
पोलीस महानगर नेटवर्क
अहिल्यानगर : काळीजादू करून पैशांचा पाऊस पाडतो, आजार बरे करतो आणि करणी दूर करतो, असे आमिष दाखवून एका कुटुंबाची लाखोंची फसवणूक तसेच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने भोंदूबाबाला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. महादेवनाथ बाबा उर्फ ज्ञानदेव तुकाराम कांबळे (वय ४२, रा. शिर्सुफळ, आटोळेवस्ती, बारामती, पुणे) असे दोषीचे नाव आहे.
जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती एम. एस. भदाणे यांनी हा निकाल दिला. न्यायालयाने आरोपीला विविध कलमान्वये दोषी धरत ४ हजार रुपयांचा दंड ठोठावला असून दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनिल ढगे यांनी काम पाहिले.
अहिल्यानगर जिल्ह्यात अलीकडच्या काळात भोंदूबाबांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकरणाचा तपास पारनेर पोलीस ठाण्याचे तत्कालीन उपनिरीक्षक एच. एन. उगले यांनी केला होता. सुनावणीदरम्यान पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण आणि पैरवी अधिकारी आर. डी. अडसूळ यांनी सहकार्य केले.
पारनेर तालुक्यात घडलेल्या या प्रकरणात आरोपीने स्वतःला देवऋषी असल्याचे भासवून पीडित कुटुंबाचा विश्वास संपादन केला होता. घरातील आजारपण, मेंढ्यांचा मृत्यू आणि करणी यांपासून मुक्तता मिळवून देण्यासाठी होमहवन व विशेष पूजा करावी लागेल, असे सांगून त्याने कुटुंबाला जाळ्यात ओढले. पीडित मुलगी सतत आजारी पडत असल्याने तिच्यावर विशेष पूजा करावी लागेल, असे सांगत आरोपीने तिच्या वडिलांकडून तब्बल ५ लाख ५० हजार रुपये उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले.
दरम्यान, नोव्हेंबर २०२० मध्ये पीडित मुलगी घरात एकटी असताना आरोपीने तिचा विनयभंग केला. त्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये एअरगनचा धाक दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप सिद्ध झाला. पूजेसाठी काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल केले. “तू माझी पत्नी आहेस, माझ्या घरी नांदायला ये, अन्यथा जादूटोणा करून तुमचे घर उद्ध्वस्त करीन,” अशी धमकीही आरोपीने दिल्याचे न्यायालयीन सुनावणीत समोर आले.